राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने कंत्राटी प्राध्यापकांच्या नियुक्त्या करताना घोळ केल्याचा आरोप महाराष्ट्र प्राध्यापक सेनेने केला आहे.कंत्राटी प्राध्यापक भरतीची निवड यादी जाहीर न करताच नियुक्ती पत्र देण्यात आले असून संपूर्ण भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचे सांगत यावर्षीही आपल्या पाठीराख्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना नियुक्त्या देण्याचा पायंडा कायम ठेवण्यात आल्याचा आरोप होत आहे.विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील विविध शैक्षणिक विभागात मोठ्या प्रमाणात सहाय्यक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यापीठाने जुलै महिन्यात जवळपास १२६ कंत्राटी प्राध्यापकांची पदे भरण्यासाठी जाहिरात काढली.

हेही वाचा >>> नागपूर : ‘नीट’ परीक्षेत उपराजधानीतील विद्यार्थी चमकले

त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात उच्च गुणवत्ता धारक उमेदवारांना डावलून आपल्या कार्यकर्त्यांचा भरणा करण्यावर विद्यापीठाने विशेष भर दिला, असा आरोप आहे. निवड झालेल्यांना ५ व ६ सप्टेंबरला नियुक्ती पत्रे देण्यात आली. मात्र प्रशासनाने या भरती प्रक्रियेची निवड यादी जाहीर करणे टाळले.१२६ कंत्राट प्राध्यापकांमध्ये विविध प्रवर्गांच्या जागा भरायच्या होत्या. परंतु निवड यादी जाहीर न केल्याने कोणत्या प्रवर्गातून किती जागा भरण्यात आल्या याबाबत माहिती नाही. तसेच आरक्षण धोरण पाळले गेले की नाही, हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने निवड यादी जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्राध्यापक सेनेने केली आहे. तसेच उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी बाहेरच्या विद्यापीठातील तज्ज्ञांची नेमणूक करण्याऐवजी आपल्या मर्जीतील प्राध्यापक नेमण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> नागपूर : प्रेमासाठी वाट्टेल ते, प्रेयसीवर पैसे उडविण्यासाठी चोरल्या १८ दुचाकी

विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागातील वर्ग हे ११ ते ५ यावेळेत असतात. कंत्राटी प्राध्यापकाने एकाच ठिकाणी काम करणे आवश्यक असल्याचा नियम आहे. मात्र असे असताना विद्यापीठात निवड झालेल्या अनेक कंत्राटी प्राध्यापक हे विविध महाविद्यालयात सकाळी आणि रात्रकालीन महाविद्यालयात तासिका तत्त्वावर काम करतात, असा आरोपही करण्यात आला आहे.प्रशासनाने १४ नोव्हेंबर २०१८च्या शासन निर्णयानुसार प्रती तासिका ६०० रुपये देण्याऐवजी विविध पदव्युत्तर विभागातील तासिका शिक्षकांना नोव्हेंबर २०१८ ते ३० एप्रिल २०१९ या कालावधीतील मानधन जुन्याच दराने म्हणजेच ३०० रुपये प्रती तासिका या दराने दिले आहे. त्यामुळे तासिका तत्वावरील शिक्षकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यासंदर्भात कुलसचिवांना अनेकदा निवेदन देऊनही त्यांनी वाढीव मानधन दिले नसल्याचा आरोप महाराष्ट्र प्राध्यापक सेनेने केला आहे.