वर्धा : पालिका निवडणुका जवळ येताच राजकीय घडामोडी वेग घेऊ लागल्या आहेत. युती, आघाडी करायची की नाही यावर खल होत आहे. सर्व ते बळ असलेला भाजप स्वबळावर लढण्याची उर्मी ठेवून आहे. मित्र पक्ष भाजपच्या खिजगिणतीत नसल्याच्या हालचाली सूरू झाल्यात. पण काँग्रेस मात्र सगळ्यांना घेऊन चला, भाजपचा पराभव हे टार्गेट ठेवा, असे आवाहन करीत वाटाघाटी करीत असल्याचे ताजे चित्र आहे.
जिल्हा काँग्रेस समिती व राष्ट्रवादी शरद पवार यांच्यात आज सायंकाळी चर्चेची पहिली फेरी आटोपली. त्यात जिल्ह्यातील सहा पालिकांचे नगराध्यक्ष पदाचे वाटप निश्चित झाले आहे. त्यानुसार तीन काँग्रेस, दोन राष्ट्रवादी व एका ठिकाणी या दोघात मैत्रीपूर्वक लढत देण्याचे ठरले. वर्धा, देवळी व पुलगाव काँग्रेसकडे, हिंगणघाट व आर्वी राष्ट्रवादी काँग्रेस व सिंदीत मैत्रीपूर्वक लढत, असा फॉर्मुला पक्का झाला. पण खरी गोम पुढेच आहे.
नगराध्यक्ष पदाचा फॉर्मुला निश्चित करतांना प्रभागनिहाय वाटप अडचणीचे ठरत आहे. ८० टक्के प्रभाग वाटून झाले. पण उर्वरित २० टक्के प्रभाग चांगलेच वाद निर्माण करणारे ठरत आहे. काँग्रेस जर हे प्रभाग राष्ट्रवादी साठी सोडणार असेल तर आमची निष्ठा मातीत घालणार कां, असा सवाल या प्रभागातील ईच्छुक काँग्रेस नेते विचारत आहे. प्रभाग सोडणार असाल तर आमचा पक्षास रामराम म्हटल्या जात असल्याने त्याची दखल काँग्रेस नेते घेत आहे. विशिष्ट प्रभाग दिले नाही नाही तर नगराध्यक्षपद अडचणीत येणार, हे काँग्रेस ओळखून आहे.
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले म्हणतात की नगराध्यक्ष पदाबाबत काही ताळमेळ झाला आहे. आज रात्री आम्ही परत चर्चा करणार आहोत. मार्ग निघेल. कारण आमचे उद्दिष्ट निश्चित आहे. भाजपचा पराभव करण्याचे आमचे टार्गेट आहे. त्यामुळे समन्वय होईल, असा विश्वास वांदिले व्यक्त करतात.
राष्ट्रवादी, काँग्रेस व ठाकरे सेना हे मित्र पक्ष आहेत. यात आजच्या घडीला दोन एकत्र असून ठाकरे सेना वेगळी पडली आहे. ठाकरे सेना थेट हिंगणघाट नगराध्यक्ष पदावर दावा ठोकत आहे. या हिंगणघाट मतदारसंघात उमेदवार राहलेले अतुल वांदिले हे आता राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसीचे अध्यक्ष आहेत . त्यांच्याच मतदारसंघातील पालिका अध्यक्षपदावर ठाकरे सेना हक्क सांगत आहे. ही बाब अशक्य म्हणून या सेनेस बाजूला सारून काँग्रेस व राष्ट्रवादी दोघेच मिळून पालिका निवडणूक लढणार हे आता अटळ. त्यातच अद्याप राष्ट्रवादीतील सहकार गट बाकीच आहे. वर्धा नगराध्यक्षपद तिकीट कोणत्या उमेदवारास जाणत, यावर ते पुढची खेळी खेळणार.
