मुंबई, नागपूर : कुख्यात दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपावरून आमदार नवाब मलिक यांच्या महायुतीमधील प्रवेशास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला असतानाच दाऊदचाच साथिदार इक्बाल मिर्चीशी आर्थिक संबंध असणारे प्रफुल पटेल भाजपला कसे चालतात, असा सवाल करीत काँग्रेस आणि ठाकरे गटाने शुक्रवारी भाजपची कोंडी केली. मलिक यांच्याप्रमाणेच पटेल यांच्याबाबतही तुमच्या भावना तीव्र आहेत का, असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आणि लागोपाठ दुसऱ्या दिवशी भाजपला अडचणीत आणले.
मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्याने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपची कोंडी झाली होती. त्यातूनच मलिक यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे पत्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविले होते. त्याचे राजकीय कवित्व कायम असतानाच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या इक्बाल मिर्चीशी असले आर्थिक संबंधांवरून ठाकरे गट आणि काँग्रेसने भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा >>> नवाब मलिक पुन्हा विधान भवन परिसरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात, अजित पवार म्हणतात…
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लागोपाठ दुसऱ्या दिवशी फडणवीस आणि भाजपची कुरापत काढली. दानवे यांनी फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात, नवाब मलिक यांच्याबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावना वाचून आनंद झाल्याचे म्हटले आहे. ‘‘नैतिकता आणि राष्ट्रवाद याबाबत तुम्ही किती पक्के आहात हेच त्यातून दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोंदिया विमानतळावर स्वागत करणारे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणारे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांचे दाऊदचा साथिदार इक्बाल मिर्ची याच्याबरोबर आर्थिक संबंध जागजाहीर आहेत. या आर्थिक व्यवहारातूनच ‘ईडी’ने पटेल यांची संपत्ती जप्त केली. मलिक यांच्याबाबत आपण ज्या तीव्र भावना व्यक्त केल्या तशाच पटेल यांच्याबाबत आहेत का, याचे स्पष्टीकरण द्यावे,’’ अशी मागणी दानवे यांनी केली. मलिक आणि पटेल यांच्यावरून ठाकरे गट आणि विशेषत: विरोधी पक्षनेते दानवे यांनी भाजपपुढे नैतिक संकट उभे केले आहे.
पटेल यांचे इक्बाल मिर्चीशी कथित संबंध असल्यावरून काँग्रेसनेही भाजपला प्रश्न केला आहे. मलिक यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे आहेत. ते महायुतीत नको ही उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. मलिक चालत नाहीत तर मग दाऊद इब्राहिमचा साथिदार इक्बाल मिर्चीशी संबंधित पटेल उपमुख्यमंत्री फडणवीस यांना कसे चालतात, असा सवाल करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांचे देशप्रेम नकली असल्याची टीका केली. अशा नकली देशप्रेमाचे नाटक महाराष्ट्रात चालणार नाही, असा टोलाही पटोले यांनी लगावला.
दाऊदचा साथिदार इक्बाल मिर्चीबरोबर आर्थिक संबंध असणारे खासदार पटेल यांचे घरही ईडीने जप्त केले आहे, मग पटेल यांच्याबद्दल फडणवीस यांची भूमिका काय, ते त्यांनी जाहीर करावे. माफिया दाऊद इब्राहिमशी संबंधित एक व्यक्ती देशद्रोही तर मग दुसरी व्यक्ती देशप्रेमी आहे का, असा सवालही पटोले यांनी केला.
फडणवीस-पटेल भेट
प्रफुल पटेलप्रकरणी ठाकरे गट आणि काँग्रेसने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असतानाच विधान भवनात पटेल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत नवाब मलिक प्रकरणावरून पटेल यांनी पक्षाची भूमिका फडणवीस यांच्याकडे स्पष्ट केली. विदर्भातील धान पीक उत्पादकांचे अवकाळी पावसाने मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस तसेच अजित पवार यांची भेट घेतल्याचे पटेल यांनी सांगितले.
फडणवीस-मलिक समोरासमोर..
नवाब मलिक यांच्या महायुतीमधील प्रवेशास फडणवीस यांनी विरोध केल्याने महायुतीतील दोन पक्षांमध्ये धुसफूस सुरू झाली असतानाच विधान भवनाच्या प्रांगणात उपमुख्यमंत्री फडणवीस आणि नवाब मलिक समोरासमोर आले. दोघांनी परस्परांना लांबूनच नमस्कार केला. दोघांनीही एकमेकांशी बोलणे टाळले.
मलिक यांना मनाई?
मलिक यांची उपस्थिती तापदायक ठरू लागल्याने त्यांना सोमवारपासून नागपूरमध्ये न येता मुंबईतच थांबण्याचा सल्ला देण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले.
मलिक सत्ताधारी बाकावरच
नवाब मलिक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी बाकावर बसल्याने भाजपची अडचण झाली होती. म्हणूनच फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहिले होते. त्यानंतर सुनील तटकरे यांनी मलिक यांचा राष्ट्रवादीतील घडामोडींशी संबंध नाही, अशी सारवासारव केली होती. तरीही शुक्रवारी, दुसऱ्या दिवशी मलिक सभागृहात सत्ताधारी बाकावरच बसले होते. यावर अजित पवार यांनीच निर्णय घ्यावा, अशी टिप्पणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.