एकजूट दाखविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

भाजपला रामराम करून काँग्रेसवासी झालेले भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक डॉ. रवींद्र उपाख्य छोटू भोयर यांनी विधान परिषदेच्या नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज भरताना डॉ. छोटू भोयर. त्यांच्या समवेत डॉ. नितीन राऊत, सुनील के दार व इतर नेते.

छोटू भोयर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नागपूर : भाजपला रामराम करून काँग्रेसवासी झालेले भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक डॉ. रवींद्र उपाख्य छोटू भोयर यांनी विधान परिषदेच्या नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज दाखल केला. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांला फोडून भाजपला धक्का दिल्यानंतर आज काँग्रेसच्या विविध गटातील नेत्यांनी अर्ज दाखल करण्यासाठी एकत्र एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयात  छोटू भोयर यांच्यासोबत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत,  मंत्री सुनील केदार, काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक, आमदार अ‍ॅड. अभिजीत वंजारी, आमदार राजू पारवे, शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आमदार अ‍ॅड. आशीष जैस्वाल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर, विशाल मुत्तेमवार, माजी नगरसेवक प्रशांत धवड, नागपूर ग्रामीणचे काँग्रेस प्रभारी रवींद्र दरेकर आणि शेकडो कार्यकर्ते होते. ही सगळी मंडळी पंचायत भवन येथून पायी निघाली आणि जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचली.

अशाप्रकारे काँग्रेसच्या विविध गटांनी भोयर यांच्यासाठी एकत्र असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.  काँग्रेसच्या पायी मार्चमुळे  शहरात कुठे जमावबंदी आहे, असे वाटत नव्हते. तसेच करोनाच्या नियमाचे पालन झाल्याचे दिसून आले नाही. 

पदवीधरप्रमाणे याही निवडणुकीचा निकाल 

जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पदवीधर मतदारसंघ आणि जि.प. पोटनिवडणुकीचा निकाल बघितल्यास आम्ही लोकांचा विश्वास जिंकला आहे. त्याच आधारावर आम्ही विधान परिषदेची ही निवडणूक जिंकू. काँग्रेस निवडणूक जिंकण्यासाठीच लढते, असे मत मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले.

निकालाअंती भाजप छिन्नविछिन्न असेल

महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या ताकदीवर आपण ही निवडणूक जिंकू, असा विश्वास व्यक्त करताना डॉ. छोटू भोयर यांनी येत्या १४ डिसेंबरला भाजप आणि विरोधक छिन्नविछिन्न अवस्थेत दिसतील, असा दावाही केला.

पाच उमेदवारांचे १० अर्ज

 दहा डिसेंबरला होऊ  घातलेल्या विधान परिषदेच्या नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत (२३ नोव्हें.) पाच उमेदवारांनी दहा अर्ज दाखल केले. यात भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसकडून डॉ. रवींद्र (छोटू) भोयर यांच्यासह काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे, मंगेश देशमुख (अपक्ष), सुरेश दौलतराव रेवतकर (अपक्ष) यांचा समावेश आहे. बुधवारी २४ला अर्जाची छाननी होईल व  शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Congress attempt show unity ysh

Next Story
‘तो’ पोपट १५ दिवसांपासून वन कोठडीतच
ताज्या बातम्या