पक्षप्रवेश कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

युतीची सरकार स्थापन झाल्यावर सुरुवातीच्या राजकीय अस्थीरतेच्या काळात गोंदियाचे काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपच्या मदतीला येण्याची तयारी दर्शवली होती. पण आपण त्यांना एक महिन्यात निवडणूक लादू नका, असा सल्ला दिला. अग्रवाल पाच वर्षांपासून तनाने काँग्रेसमध्ये असले तरी मनाने भाजपमध्येच होते व काँग्रेसमध्ये राहून भाजपचेच काम करीत होते, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केला.

काँग्रेसचे आमदार गोपालादास अग्रवाल यांनी सोमवारी रात्री नागपुरात मुख्यंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत काँग्रेसचे गोंदिया जिल्हा परिषद सदस्य, सहकारी बँकेचे सदस्य तसेच दक्षिण-पश्चिम नागपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचे माजी अध्यक्ष आशीष नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. मुख्यमंत्री फडणवीस केवळ या कार्यक्रमासाठी नागपुरात आले होते.

यावेळी फडणवीस म्हणाले, युतीचे सरकार येऊन एक महिना (डिसेंबर २०१४) झाला होता. काही राजकीय अडचणी होत्या. त्यावेळी अग्रवाल यांनी विदर्भाचा मुख्यमंत्री कायम राहावा म्हणून कोणत्याही वेळी आमदारकीचा राजीनामा देऊ आणि भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली होती. मात्र मीच त्यांना थांबवले. ते पाच वर्षे कायम भाजप सोबत होते. त्यामुळे विरोधी पक्षाकडे असणाऱ्या लोकलेखा समितीचे अध्यक्षपद आम्ही अग्रवाल यांना दिले होते. त्यांनी यापदावर राहून काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांचे गैरव्यहार चव्हाटय़ावर आणले. आधी सरकारमध्ये असताना देखील अग्रवाल सरकारविरोधात बोलत होते. त्या अर्थाने भाजपमध्ये होते. आता त्यांच्या प्रवेशामुळे भाजपने कधीही न जिंकलेले गोंदिया विधानसभा भाजपला मिळेल, असा विश्वासही फडणवीस यांना व्यक्त केला.

पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन फडणवीस यांनी गोंदियाच्या विकासासाठी मदत केली. सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावले. विकासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करीत आहे. त्यासाठी आपली पत्नी देखील आग्रही होती, असे गोपलदास अग्रवाल म्हणाले.

गोंदियाचे काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यासोबत नागपुरातील काँग्रेसचा एक मोठा नेता भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा दिवसभर समाज माध्यमावर होती. प्रत्यक्षात भाजपच्या गळाला एकही मोठा नेता लागला नाही. तेव्हा राष्ट्रवादीच्या एका माजी पदाधिकाऱ्याचा प्रवेश करून समाधान मानून घेण्यात आला. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसचे काही नेते तांत्रिक कारणामुळे भाजपमध्ये प्रवेश करू शकत नसल्याचे म्हणून वेळ मारून नेली.

मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेऐवजी ऐनवेळी संयुक्त पत्रक काढून महायुतीची घोषणा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री नागपुरात होते. आपल्याला माध्यमांकडून महायुती झाल्याचे कळले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पाच वर्षांत केलेल्या कामाच्या आधारावर जनतेचा आशीर्वाद मागू व मोठा जनादेश आमच्या महायुतीला मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

युतीची संयुक्त पत्रकार परिषद टाळण्यासाठी अग्रवाल यांचा नागपुरात पक्षप्रवेश?

महायुतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषदेद्वारे करणार, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मुंबईत जाहीर केले होते. मात्र ही पत्रकार परिषद टाळून सायंकाळी मुख्यमंत्री काँग्रेस आमदार गोपाल अग्रवाल यांचा भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी नागपुरात आले. विशेष म्हणजे, सोमवारी सकाळी मुंबईत काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी अग्रवाल यांना बोलवता आले असते. पण तसे न करता अग्रवाल यांच्या पक्ष प्रवेशासाठी नागपुरात सायंकाळी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तो पूर्वनियोजित होता, ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री नागपुरात आले. त्यामुळे युतीची संयुक्त पत्रकार परिषद त्यांना टाळायची होती हे ठरले होते का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विशेष म्हणजे, नागपुरात मुख्यमंत्री आल्यावर मुंबईत युतीची घोषणा एका पत्रकाद्वारे करण्यात आली.