लोकसत्ता टीम

नागपूर : केंद्रीय मंत्री व भाजप नेते नितीन गडकरी यांनी नागपूर लोकसभा निवडणुकीत पाचव्या फेरीनंतर काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्यावर दहा हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली आणि शहर काँग्रेसच्या कार्यालयात स्मशान शांतता परसली. या कार्यालयात एकही कार्यकर्ता किंवा कर्मचारी नसल्याने दुपारी १ वाजताच्या सुमारास कुलूप लावण्यात आले होते.

नागपूर लोकसभा मतदारसंघात गडकरी विरुद्ध ठाकरे यांच्या चुरशीची लढत होईल, असा अंदाज बांधण्यात येत होता. परंतु पहिल्या फेरीपासून गडकरी यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. पाचव्या फेरीत केवळ थोडे अधिक मत ठाकरे यांना मिळाले. या फेरीत गडकरी यांना ५ हजार ६० मते तर ठाकरे यांना ६ हजार ४२३ मते मिळाली. परंतु पाच फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर गडकरी यांना २९ हजार ९२६ आणि ठाकरे यांना १९ हजार ६८४ मते मिळाली. काँग्रेस कार्यकर्ते आज सकाळी मतदान मोजणी केंद्रावर उत्साहात दिसत होते. परंतु ठाकरे हे मतदान मोजणीत पिछाडीवर दिसत असल्याने हे कार्यकर्ते काहीसे हिरमुले होते. शहर कार्यालयातून कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला. काही कार्यकर्ते दक्षिण नागपुरातील महाकाळकर सभागृहातून मतदानाच्या आकडेवारीवर नजर ठेवून होते. काँग्रेसने प्रत्येक मतदारसंघात पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांना थांबण्याची आणि कुठून काही तक्रार प्राप्त झाल्यास तेथे पोहोचण्याची सूचना केली होती. त्यानुसार काँग्रेसने महाकाळकर सभागृहात ही व्यवस्था केली होती. तर विकास ठाकरे काही निवडक कार्यकर्त्यांसह आपल्या निवासस्थानी मतमोजणीचे अपडेट घेत होते.

आणखी वाचा-Vidarbha Election Results : विदर्भातील निवडणूक निकालाने भाजप कार्यकर्त्यामध्ये अस्वस्थता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नागपुरातील निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. गडकरी हे राष्ट्रीय नेते म्हणून त्यांच्याकडे बघितल्या जाते. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसला ही निवडणूक सोपी नसल्याचे आधीपासून माहिती होते. परंतु ठाकरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर चित्र बदलेल अशी अपेक्षा होती. काँग्रेसने दलित, मुस्लीम, बौद्ध आणि कुणबी मतांच्या जोरावर ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र, पहिल्या पाच फेरीनंतर कार्यकर्त्यांची निराशा होतानाचे चित्र होते. त्याचा परिणाम शहर काँग्रेसच्या कार्यालयावर दिसून आला. या कार्यालयाला कुलूप लावून कार्यकर्ते आपआपल्या घरी परतले होते. मात्र, महाकाळकर सभागृहात काही कार्यकर्ते मतमोजणीकडे डोळे लावून बसले होते. गडकरी यांनी मागील दोन्ही निवडणूक मोठ्या मताधिक्‍याने जिंकल्या आहे. यामुळे ते यावेळी ते किती मताधिक्‍य घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.