चंद्रपूर : महादेव मंदिर हे भारत सरकारद्वारे ११ एप्रिल १९२८ च्या अधिसूचनेनुसार केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय)नुसार, या मंदिराच्या परिसरात महापालिकेच्या माध्यमातून ‘अम्मा चौक’ स्मारकासाठी अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण झाल्याची तक्रार चंद्रपूर शहर-जिल्हा काँग्रेसतर्फे करण्यात आली होती. त्या तक्रारीची दखल घेत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने यासंदर्भात महापालिका आयुक्तांना नोटीस बजावली. या नोटीसमुळे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्रींच्या नावे सुरू असलेले चौक व स्मारकाचे बांधकाम महापालिका आयुक्तांना हटवावे लागणार आहे.

या नोटीसनुसार, प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्व स्थळे व अवशेष अधिनियम १९५८ नुसार या संरक्षित स्मारकाच्या १०० मीटरच्या परिसरात अनधिकृत बांधकाम, उत्खनन किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम (निर्माण) किंवा नूतनीकरण करण्यास सक्त मनाई आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस दोन वर्षांपर्यंतचा कारावास आणि/किंवा एक लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. याप्रकरणी भारत सरकारने चंद्रपूर येथील पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना अनधिकृत बांधकामाची प्रक्रिया थांबवून सात दिवसांच्या आत अतिक्रमण हटवण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार, सात दिवसांच्या आत अतिक्रमण हटवले नाही, तर स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने ते हटवण्यात येईल आणि संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

निर्मूलन कारवाई लवकरच !

संरक्षित स्मारकाच्या परिसरात कोणत्याही बांधकामाची दुरुस्ती करायची असेल, तर त्यासाठी सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाने महादेव मंदिराच्या संरक्षित परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर आणि अतिक्रमणांवर लक्ष केंद्रित केले आहे. मंदिर परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे