राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या मध्य नागपुरात पुन्हा एकदा कमळ फुलले आहे. मात्र एरवी जास्त मताधिक्य मिळत असलेल्या महाल आणि संघाच्या परिसरातील प्रभागात मात्र भाजपाचे मताधिक्य यावेळच्या विधानसभा निवडणुकीत कमी झाले आहे. या प्रभागातील ६५ बुथपैकी किमान ३५ बुथवर काँग्रेसला मताधिक्य आहे तर २० च्यावर नोटाला मतदान करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कमी मताधिक्य ही भाजपसाठी धोक्याची घंटा असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपकडून शहरातील विविध मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. संघाचे मुख्यालय हे मध्य नागपुरात असल्यामुळे संपूर्ण देशाचे या मतदारसंघाकडे लक्ष असते. हलबा आणि मुस्लीम समाज मोठय़ा प्रमाणात असले तरी गेल्या काही वर्षांत भाजपचे प्राबल्य वाढले आहे.

यंदा सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाच्या पदाधिकाऱ्यांनी  आदितवार शाळेत मतदान केले. मध्य नागपूर मतदारसंघात दोन बुथ असून त्यात भाजपाचे उमेदवार विकास कुंभारे यांना ५७४ मते मते पडली. त्या तुलनेत काँग्रेसचे बंटी शेळके यांना ३६९ मते मिळाली. ती मागच्या निवडणुकीपेक्ष जास्त आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ज्या महापलिका कार्यालयातील  केंद्रावर मतदान केले त्यातील दोन बुथवर शेळके यांना  ५६८ तर कुंभारे यांना ३६९ मते मिळाली. त्याच्या शेजारी असलेल्या बुथवर १९४ शेळके तर कुंभारे यांना १७६ मते मिळाली. संघ परिसरात भाजपाला मताधिक्य असले तरी कोठी रोड, दसरा रोड, किल्ला, नाईक रोड, गाडीखाना, तुळशीबाग, राहतेकर वाडी, गणेशपेठ हा भाजपचा गड असलेल्या भागात शेळके यांना मताधिक्य मिळाले आहे.

चिटणीसपुरा भागातील बुथवर भाजपला ३६९ तर काँग्रेसला ३१५ मते मिळाली. गडकरी यांचे निवासस्थान असलेल्या उपाध्ये मार्गासह या भागातील बुथवर शेळके यांना ३९२ व कुंभारेंना २७४ मते मिळाली. या भागातील प्रभागांमध्ये बंटी शेळके हे एकमेव काँग्रेसचे नगरसेवक आहेत.  उर्वरित सर्व नगरसेवक भाजपाचे आहेत. भाजपाच्या या बालेकिल्यात काँग्रेसचे मताधिक्य वाढल्याने आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचा गड कायम ठेवण्यासाठी भाजपाला चांगलेच परिश्रम घ्यावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये मध्य नागपुरातील संघ मुख्यालय व महाल परिसरातील काही बुथवर भाजपाला कमी मतदान झाले. यावर बुथ प्रमुखांची बैठक घेऊन त्यावर चिंतन करू. ज्या भागात कमी मते मिळाली त्या भागात जास्त लक्ष देऊन पुन्हा भाजपचे मताधिक्य कसे वाढेल यासाठी प्रयत्न करू.

-बंडू राऊत, मध्य नागपूर, मंडळ अध्यक्ष.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress in lead at several booths in the sangh headquarters area abn
First published on: 02-11-2019 at 00:47 IST