यवतमाळ : जिल्हा काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नेत्यांविरूद्ध दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर प्रदेश काँग्रेसने समन्वयाची जबाबदारी सोपविली. येथील काँग्रेस भवनमध्ये केदार यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते व दुसऱ्या फळीतील नेत्यांनी एकमेकांविरूद्ध गंभीर आरोप केले. त्यामुळे या वादावर पडदा पडण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही.
जिल्ह्यात गेल्या १० वर्षांत काँग्रेसचे पानिपत झाले. पक्षातील ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके या नेत्यांचा वारंवार पराभव होवूनही पक्षाची सर्व सुत्रे याच नेत्यांच्या हातात असल्याचा आरोप दुसऱ्या फळीतील नेत्यांनी दोन आठवड्यांपूर्वी बैठक घेत केला. मात्र या नेत्यांचे आरोप ज्येष्ठांनी फेटाळून लावले आहे. प्रवीण देशमुख, देवानंद पवार या नेत्यांनीच निवडणूक काळात पक्षविरोधी कारवाया केल्याचे ठामपणे केदार यांना सांगितले. माजी मंत्री वसंत पुरके यांनी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी राळेगाव विधानसभा मतदारसंघात पक्षविरोधी काम केल्याचा थेट आरोप केला. काँग्रेसमध्ये प्रवीण देशमुख नकोच, अशी टोकाची भूमिका पुरके यांनी मांडली.
माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी त्यांचेच एकेकाळचे स्वीय सचिव राहिलेल्या देवानंद पवार यांच्या विरोधात तोफ डागली. पवार यांनी सर्वच निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचे सांगितले. पवार यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी आपण यापूर्वीच वांरवार पक्षश्रेष्ठींकडे केल्याचे मोघे म्हणाले. तर, यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या विरोधात केदार यांच्याकडे तक्रार नोंदविली. महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष असुनही संध्या सव्वालाखे कधीही प्रचारात सहभागी झाल्या नाहीत. त्यांनी पक्षाविरोधात काम केल्याने त्यांना पक्षातून काढा, अशी मागणी आमदार मांगुळकर यांनी केली. यासोबतच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनीही विधानसभा निवडणुकीत आपल्या विरोधात काम केल्याचा आरोप मांगुळकर यांनी केला.
दुसऱ्या फळीतील नेते देवानंद पवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, माजी सभापती अरूण राऊत, नरेंद्र ठाकरे, संजय खाडे, शंकर बडे, विजय पाटील आदींनी सुनील केदार यांच्याकडे बाजू मांडली. काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते पक्षात वर्षानुवर्षे पदांना चिकटून बसले आहेत. त्यामुळे नवीन लोकांना संघटनेत काम करण्याची संधी मिळत नाही. हे नेते कार्यकर्त्यांपेक्षा त्यांच्या मुलांना स्थिरस्थावर करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचा आरोप दुसऱ्या फळीतील नेत्यांनी केला. आम्ही कायमच पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले. नेते त्यांच्या प्रवृत्तीमुळे पराभूत झाले, मात्र आता आम्हाला जबाबदार धरत आहेत, असा आरोप केला. त्यांनी शिस्तपालन समितीकडे आमची तक्रार का केली नाही? असा प्रश्न या नेत्यांनी उपस्थित केला. वरिष्ठ नेत्यांना संघटना पातळीवरील कामाची पद्धत माहिती असताना दुसऱ्या फळीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कुठल्याच बैठकीत, कार्यक्रमात सहभागी होवू देत नसल्याचा आरोप यावेळी युवा नेत्यांनी केला. घासलेली कॅसेट किती दिवस वाजवणार, असा प्रश्न या नेत्यांनी उपस्थित केला. तसेच वरिष्ठ नेत्यांना पदावरून काढले नाही तर, पुढे कोणतीही चर्चा करणार नसल्याचे स्पष्ट केले.
दोन्ही गटांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर अवाक् झालेले समन्वयक सुनील केदार यांनी आपण येथील चर्चेचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना सादर करू. त्यानंतर ते निर्णय घेतील, असे सांगितले. जिल्ह्यातील काँग्रेसमधील या गटबाजीमुळे काँग्रेसच काँग्रेसला संपवित असल्याची भावना सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांची झाली आहे. आता प्रदेशाध्यक्ष सपकाळ याबाबत काय निर्णय घेतात, याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.