अमरावती : येथील इर्विन चौकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव महापालिकेने २००६ मध्येच मंजूर केला असताना खासदार नवनीत राणांची आता या मुद्यावरही खोटे श्रेय घेण्याची केविलवाणी धडपड सुरू असल्याची टीका काँग्रेस प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर यांनी केली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या अस्तित्वामुळे इर्विन चौक असे नाव या चौकाचे १७ वर्षांपूर्वीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असे नामकरण झालेले असताना खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा नाव देण्याचा अट्टाहास का केला असा सवाल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा >>>नागपूर: धवनकरांनी प्राध्यापकांना पैसे मागितल्याची ध्वनिफीत ‘लोकसत्ता’च्या हाती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना खासदार नवनीत राणा यांनी त्या चौकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक संबोधून आपल्यामुळेच आज हा बदल झाला, असे ठासविण्याचा प्रयत्न केला होता. मुळात तसे काही नसून महापालिकेने रीतसर प्रस्तावाद्वारे २००६ सालीच अधिकृतपणे हा बदल केला आहे. त्यामुळे नवनीत राणा यांनी उगाच खोटे बोलून जनतेची दिशाभूल चालविल्याचा आरोपही बोरकर यांनी केला आहे.
खासदार राणा यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने खोटे असल्याचा निकाल देवून त्यांचेवर आर्थिक दंड ठोठावला आहे. तरीही नवनीत राणा यांची खोटे बोलण्याची सवय काही जात नाही, अशी टीकाही किशोर बोरकर यांनी केली आहे.अनुसुचित जातीचे खोटे प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे नवनीत राणा या श्रध्देय हनुमानजींच्या आश्रयाला गेल्या आहेत. दर्गा व बौध्द विहारांचे उंबरठे झिझवणाऱ्या नवनीत राणा यांना आता हनुमान चालीसा कशी आठवली ॽ असा सवालही किशोर बोरकर यांनी केला आहे.
हेही वाचा >>>नागपूर: ‘समृद्धी’वर वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांना अडवले! प्रथमच स्वयंचलित यंत्रणेतून कारवाई
शहरातील कोणत्याही भागाचे, नगराचे किंवा चौकाचे नामकरण करावयाचे असल्यास महानगरपालिकेच्या विधी समितीत प्रथमत: ठराव मंजूर करुन घ्यावा लागतो. त्यानंतर सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर झाल्यानंतरच तो अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर केला जातो. शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द झाल्यानंतर सदर नामकरण मंजूर होत असते.
याच नियमान्वये ११ सप्टेंबर २००६ घ्या विधी समितीच्या सभेत तत्कालीन नगरसेविका डॉ. कांचन ग्रेसपुंजे यांनी इर्विन चौकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, यासाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर २० ऑक्टोबर २००६ घ्या सर्वसाधारण सभेत इर्विन चौकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असे नामकरण करण्याचा ठराव मंजूर झाला, अशी माहिती किशोर बोरकर यांनी दिली आहे.