नागपूर: औरंगजेबाच्या कबरीवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात वादंग सुरू आहे. ही कबर हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलनापासून सुरू झालेला प्रकार थेट हिंसाचार होईपर्यंत पोहोचलाय. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने विधान केले आहे. ते म्हणाले “ज्यांना कोणाला भोंगे लावायचे, खुशाल लावू द्या, हनुमान चालीसा वाचायची तर खुशाल वाचू द्या, पण तुम्ही यात तुम्ही पडू नका, “
हे आवाहन केले आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस नेते आमदार डॉ. नितीन राऊत यांनी.त्यांनु आंबेडकरी तरुणांना एक संदेश दिला आहे.
आंबेडकरी तरुणांनो ! तुम्ही शिक्षणावरुन लक्ष विचलीत होवू देवू नका. शिक्षण हाच तुमच्या उद्धाराचा मार्ग आहे. तुम्ही चांगले शिकून स्वत:चे आयुष्य घडविले तर आई वडिल, नातेवाईक व समाज यांना मदतीचा हात देवू शकता. तुम्ही सनदी सेवा, पोलिस सेवा, महसूल सेवा , अथवा खाजगी उद्योगात इंजीनीयर , मॅनेजर , तंत्रज्ञ म्हणून लागलात तर तेथील ‘सिस्टिम’ समजून येते व आपण काय करु शकतो याचा अंदाज देखील येतो.
तुम्ही वकील, डॅाक्टर, सी. ए. झालात तर न्यायव्यवस्था, आरोग्य व्यवस्था, आर्थिक व्यवस्था यांचा आपोआप अभ्यास होईल. शिक्षक, प्राध्यापक झाला तर विज्ञानवादी नवसमाज घडवाल. तुम्हाला भारत देशाचे आदर्श नागरिक म्हणून नावा रुपास यायचे आहे ! हे चालीसा वाचणे,भोंगे लावणे, जातीय दंगली करणे त्यांनाच करू देत !! ज्यांनी आम्हाला हजारों वर्षे शिक्षणापासून मुद्दाम वंचित ठेवले होते आज तेच आम्हाला विध्वसंनाच्या मार्गावर नेत आहेत. म्हणून तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आलेली आहे.
ती म्हणजे चांगले शिकून भारतीय संविधानाचे रक्षण करायचे व संसदीय लोकशाही टिकवायची आहे. आंबेडकरवादी तरुणांनो, या देशाचे भवितव्य तुमच्या हातात आहे. यासाठीच तुम्ही उच्च शिक्षण घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत देश निर्माण करा असे आवाहन डॉ राऊत यांनी या संदेशाचा माध्यमातून केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या इशारा फडणवीस म्हणाले, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची प्रतीकात्मक कबर जाळली. त्यावर ‘आयत’ लिहिलेली असल्याची अफवा पसरण्यात आली. समाजमाध्यमातून ती अफवा विशिष्ट गटापर्यंत पोहोचली. त्यानंतर सायंकाळी कटानुसार हंसापुरी, महाल चिटणीस पार्क चौक, भालदारपुरा परिसरात दंगल पेटली.
दंगलखोरांनी शासकीय संपत्तीसह नागरिकांच्या वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. या दगडफेकीत तीन पोलीस उपायुक्तांसह एकूण ४० जण जखमी झाले. सीसीटीव्ही फुटेज आणि चित्रफितींवरून दंगलखोरांची ओळख पटवण्यात येत आहे. आतापर्यंत १०४ जणांची ओळख पटली असून ९२ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये १२ विधिसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे. सर्व दंगलखोरांना अटक होईपर्यंत ही कारवाई सुरू राहील, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.