scorecardresearch

नाना पटोलेंकडून राहुल गांधींची तुलना प्रभू रामचंद्रांशी! ; म्हणाले, पदयात्रा ‘वनवासा’सारखीच

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही रामाच्या वनवासाप्रमाणेच आहे, असे पटोले म्हणाले.

नाना पटोलेंकडून राहुल गांधींची तुलना प्रभू रामचंद्रांशी! ; म्हणाले, पदयात्रा ‘वनवासा’सारखीच
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खासदार राहुल गांधी यांची तुलना थेट प्रभू रामचंद्रांंसोबत केली.

बुलढाणा : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या नियोजनासाठी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खासदार राहुल गांधी यांची तुलना थेट प्रभू रामचंद्रांंसोबत केली. राजकुमार असलेल्या रामाने वनवास भोगला आणि लंकेपर्यंत (पायी) प्रवास केला. त्याचप्रमाणे विरोधकांकडून राजकुमार म्हणून राहुल गांधीसुद्धा पदयात्रेला निघाले आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही रामाच्या वनवासाप्रमाणेच आहे, असे पटोले म्हणाले. शिंदे-फडणवीस सरकार येत्या डिसेंबरमध्ये कोसळेल, असे भाकीतही त्यांनी यावेळी केले.

आज, गुरुवारी संध्याकाळी खामगाव येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते. ते पुढे म्हणाले, भाजप हा बहुजनांचा पक्षच नाही. भाजपमध्ये बहुजनांना त्रास दिला जातो, हे मी स्वतः त्या पक्षात राहून अनुभवले आहे. भाजप नेते पांडुरंग फुंडकर, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे व आता पंकजा मुंडे यांना हा त्रास सहन करावा लागला. या बहुजन नेत्यांसोबत भाजपने काय केले, हे देशातील जनता जाणून आहे. राज्यातील ‘ईडी’चे सरकार हे जास्त दिवस टिकणार नसून डिसेंबरमध्ये या सरकारचा अंत होईल, असे भाकितही त्यांनी वर्तवले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या