नागपूर : दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर आम आदमी पक्षाने (आप) महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी काँग्रेस नेते व राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांच्या माध्यमातून पक्ष बांधणीचे प्रयत्न सुरू असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना प्रदेशाध्यक्षपदाचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

दर्डा यांच्या माध्यम समूहाकडून आयोजित एका कार्यक्रमासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे सर्वेसर्वा अरिवद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान नुकतेच नागपुरात आले होते. या दौऱ्यात ‘आप’च्या महाराष्ट्रातील पक्ष बांधणीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. केजरीवाल यांच्याशी चर्चेनंतर विजय दर्डा यांच्या पुढाकारातून चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांना ‘आप’च्या प्रदेशाध्यक्षपदाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. परंतु त्यांनी अद्याप ती स्वीकारलेली नाही.

 याबाबत आमदार जोरगेवार म्हणाले, विजय दर्डा यांनी माझ्याशी संपर्क साधून ‘आप’कडून प्रदेशाध्यक्षपदाचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. त्याबाबत आणखी चर्चा करावी लागेल. यापूर्वी अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही ‘आप’कडून मला असाच प्रस्ताव देण्यात आला होता.

दरम्यान, ‘आप’ने पक्ष विस्तारासाठी महाराष्ट्रातील काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे. महाराष्ट्रासारख्या मोठय़ा राज्यात पक्ष वाढवायचा असेल तर अनुभवी आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता पक्षाकडे असायला हवा, त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विदर्भातील काँग्रेस नेते व राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांना राज्यसभेवर पाठवून त्यांच्यामार्फत महाराष्ट्रात पक्ष विस्ताराची योजना पक्षाने आखल्याचे समजते.

मी शर्यतीत नाही. मी राज्यसभा निवडणूक लढणार नाही किंवा आम आदमी पार्टी किंबहुना इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी माझ्या वृत्तपत्रातील कामाचा आनंद घेत आहे. ही चर्चा कुठून आली याची मला माहिती नाही. वास्तविक मी चर्चा करणारा मनुष्य नाही. मी राज्यसभेच्या तीन निवडणुका लढल्या, पण त्यासाठी देखील कधी आमदारांशी चर्चा केली नाही. – विजय दर्डा, काँग्रेस नेते व माजी राज्यसभा सदस्य.

विजय दर्डा यांनी माझ्याशी संपर्क साधून ‘आप’कडून प्रदेशाध्यक्षपदाचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. परंतु, एवढा मोठा निर्णय फोनवरील चर्चेने होत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किशोर जोरगेवार , आमदार, चंद्रपूर.