वर्धा : काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलला की काही पदाधिकारी बदलण्याची प्रक्रिया ओघाने आलीच. मात्र जिल्हा पातळीवार बदल सहसा होत नसल्याचाही इतिहास आहे. म्हणून नेते पक्ष सोडून गेले तरी त्यांचे अनुयायी मात्र पद सोडत नाहीच. असेच जिल्ह्यात झाले.
काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाचा हट्ट मान्य केला होता. त्या राष्ट्रवादीने वर्धा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडून हिसकावून घेतांनाच काँग्रेसचा नेता पण दाखल करून घेतला. बिचारे काँग्रेसी मूग गिळून बसल्याचे चित्र त्यावेळी दिसून आले. लोकसभा निवडणुकीत प्रथमच काँग्रेस हद्दपार झाली होती. अनेक वर्ष पंजा चिन्ह जिल्ह्यात विजयी ठेवण्याचे श्रेय असलेल्या अमर काळे यांनी किमान आर्वीची अख्खी काँग्रेस पवारांच्या पदरात ओतली होती.
याचा राग त्या भागातील काँग्रेस नेते ठेवून होतेच. विशेष म्हणजे काळे राष्ट्रवादीचे खासदार तर झाले पण आर्वी, आष्टी व कारंजा या मतदारसंघातील तीनही तालुक्यात त्यांचेच कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून कायम होते. त्यांनी राजीनामे दिले नव्हते. नेता राष्ट्रवादीत पण काँग्रेसचे लगाम त्यांच्याच अनुयायांकडे. हे कसे चालणार ? असा सवाल काळेकृतीने संतप्त अन्य काँग्रेस नेते व्यक्त करीत. प्रामुख्याने आष्टीचे नेते व प्रदेश काँग्रेसच्या शिदोरी मासिकाचे संपादक अनंत मोहोड तसेच अखिल भारतीय किसान मोर्चाचे समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी हालचाली सूरू केल्यात. काळे तर राष्ट्रवादीवासी झाले आता आर्वीत काँग्रेस जिवंत ठेवायची असेल तर नव्याने डाव मांडावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा प्रभारी असलेले माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी तीच री ओढली. भलेही पुढे युती करून लढू. पण काँग्रेस नेतेच पदाधिकारी हवेत. खासदार काळे यांची माणसं आता काँग्रेस पदाधिकारी राहता कामा नये, असे मुळक यांनी जिल्हा सभेत स्पष्ट करून टाकले.
अखेर तसे झाले आहे. आर्वी मतदारसंघात काळे नियुक्त पदाधिकारी बदलण्यात आले आहे. नवे काँग्रेसी पदाधिकारी असे आहेत. आष्टी तालुका अध्यक्षपदी दिनेश शंकरराव लांडे यांना नेमण्यात आले आहे. आष्टी शहर – सौदानसिंग टॉक, कारंजा – भास्कर वामनराव पांडे, कारंजा शहर – गुणवंत साहेबराव मुंडे, आर्वी – चंद्रशेखर वानस्कार व शहर – सुधाकर भोयर यांच्या नियुक्त्या झाल्यात.
प्रदेश काँग्रेस समितीने याचे पत्र दिले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर सांगतात की प्रदेश समितीने हा निर्णय घेतला आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्याचे स्वतंत्र अस्तित्व असलेच पाहिजे. इतरांच्या मदतीने काँग्रेस चालणार नाही. पक्षाचे निष्ठावंत नेमा, अशी आर्वी भागातील काँग्रेस नेत्यांची भूमिका होती. ती मान्य झाली आहे.