नागपूर : बांधकाम व्यावसायिक व भाजप नगरसेवक विक्की कुकरेजा दलित महिलांना मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळ करीत असल्याची चित्रफित आज शुक्रवारी काँग्रेसने पत्रकार परिषदेत सादर केली. सोबतच या चित्रफितीद्वारे नागपूर पोलीस आयुक्तांवर कुकरेजा यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठीचा दबावही वाढवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्रकार परिषदेस अ.भा. काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय समन्वयक अनिल नगराळे, नगरसेविका नेहा निकोसे, ब्लॉक अध्यक्ष सुरेश पाटील उपस्थित होते. बाबू खान नामक युवक आणि चार दलित महिला त्यांच्या वस्तीतील मलवाहिनीची समस्या घेऊन कुकरेजा यांच्या कार्यालयात गेले होते. यावेळी कुकरेजा यांनी बाबू खान यांनी कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप केला व तसे छायाचित्र समाजमाध्यमातून

प्रसारित केले. तर दुसरीकडे काँग्रेसने बाबू खान आणि दलित महिलांना मारहाण, शिवीगाळ केल्याची तक्रार केली होती. जरीपटका पोलिसांनी बाबू खानवर खंडणीचा आणि कुकरेजा यांच्यावर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखला केला. मात्र अटक केली नाही. आज काँग्रेसने

चित्रफित सादर करून कुकरेजा यांनी केलेल्या गुन्ह्याचा पुरावा देण्याचा प्रयत्न केला.

अ‍ॅट्रासिटीच्या गुन्ह्यात आरोपीला अटक करणे बंधनकारक असताना पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत, असा आरोप अनिल नगराळे यांनी केला. विक्की कुकरेजा हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असल्याने त्यांना  जामीन मिळवण्याची पूर्ण संधी दिली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. नगरसेविका नेहा निकोसे म्हणाल्या, समाजमाध्यमावर ही चित्रफित आहे. मग ती पोलिसांना का मिळत नाही?  काँग्रेसचे उत्तर नागपुरातील ब्लॉक अध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले, विक्की कुकरेजा भूमाफिया आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेक गुन्हे केले आहेत. पोलिसांनी ही चित्रफित बघूनतरी अ‍ॅट्रासिटी अंतर्गत कुकरेजा यांना अटक करावी. या चित्रफितीमध्ये भाजपचे नगरसेवक कुकरेजा, महेंद्र धनविजय, भाजपचे उत्तर नागपूर मंडळ अध्यक्ष संजय चौधरी व इतर कार्यकर्ते बाबू खान आणि महिलांना मारहाण करताना दिसत आहेत, असेही पाटील म्हणाले. दलित महिलांना मारहाण करणाऱ्या नगरसेवकाच्या बचावासाठी भाजप नेत्यांचा पोलिसांवर दबाव आहे, असा आरोप माजी नगरसेवक सुरेश जग्याशी यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress released video of vicky kukreja beating abusing dalit women zws
First published on: 05-03-2022 at 02:48 IST