राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ८ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात दाखल होत आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राहुल गांधींच्या बरोबरीने चालता यावे म्हणून सध्या जोरात सराव करीत आहे. दररोज ‘मॉर्निंग वॉक’ सोबतच भारत जोडो यात्रेचा जिल्हास्तरावर आढावा ते घेत आहे. याच अनुषंगाने पटोले शनिवार आणि रविवार असे दोन दिवस यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

हेही वाचा- ‘भारत जोडो‘मध्ये नागपूर ग्रामीणमधून २ हजार कार्यकर्ते जाणार

नाना पटोले रविवारी ६ नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजता येथील जिल्हा क्रीडा संकुलात मॉर्निंग वॉक करणार असल्याने काँग्रेस पदाधिकारीही चालण्याची तयारी करत आहेत. उद्या ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता पटोले यांचे यवतमाळ येथे आगमन होणार आहे. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात भारत जोडो यात्रेसंदर्भात आयोजित आढावा बैठकीला ते मार्गदर्शन करणार आहेत. रविवारी सकाळी ५ वाजता येथील जिल्हा क्रीडा संकुलात मॉर्निंग वॉक झाल्यानंतर १० वाजता भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने आयोजित बाईक रॅलीत ते सहभागी होणार आहेत. दुपारी २ वाजता ते नांदेडकडे प्रयाण करणार आहेत. नांदेड येथे दाखल होणाऱ्या भारत जोडो यात्रेत यवतमाळ जिल्ह्यातील असंख्य काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्याची जय्यत तयारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने सध्या सुरू आहे.