देशातील वाढत्या महागाईच्या मुद्यावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. घाटंजी येथेही तालुका काँग्रेसने रस्त्यावर उतरत आंदोलन केले. केंद्र सरकारच्या धोरणविरोधात घोषणाबाजी करून मोदी सरकारचा निषेध नोंदवला.
घाटंजी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शैलेष इंगोले यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. सर्वसामान्य नागरीकांना रोज लागणाऱ्या आवश्यक वस्तुंवरसुध्दा जीएसटी लावण्यात आल्याने खाद्यपदार्थांची दरवाढ झाली आहे. या भाववाढीने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे अवघड झाले तरी सरकार मात्र दखल घेण्यास तयार नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
घाटंजी परिसरात मोठ्या प्रमाणात पुराने शेती खरडून गेली. मात्र मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार विरुध्द संताप आहे. सरकारच्या या तुघलकी निर्णयांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी या आंदोलन सुरू केले. घाटंजी येथील मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर उतरुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना स्थानबध्द केले. या आंदोलनात शैलेष इंगोले, संजय डंभारे, शालिकबाबू चवरडोल, रणजीत जाधव, वासुदेव राठोड यांच्यासह मोठया संख्येत कार्यकर्ते सहभागी झाले होते.