वर्धा : संविधान सत्याग्रह पदयात्रा आज सायंकाळी वर्ध्यात पोहचली. हम भारत के लोग या सामाजिक संस्थेतर्फे व महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या नेतृत्वातील ही पदयात्रा दीक्षाभुमीवरून निघाली होती. आज वर्ध्यातील मुक्काम आटोपून उद्या सकाळी पदयात्रा सेवाग्रामात पोहचणार. समारोपाच्या पूर्वसंध्येला नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तुषार गांधी, हर्षवर्धन सपकाळ, शहीद भगतसिंग यांच्या बहिणीचे पुत्र व माजी न्यायाधीश जगमोहन सिंह, माजी मंत्री राजेंद्र मुळक व रणजित कांबळे, माजी खासदार विद्या चव्हाण प्रामुख्याने हजर होते.
काय म्हणाले जगमोहन सिंह?
शहीद भगतसिंग यांचे भाचे जगमोहन सिंह म्हणाले की संघ फाळणीबाबत इतरांना दोष देतो. पण संघ फाळणीत ब्रिटिश सत्तेच्या असलेल्या भूमिकेबाबत कधीच बोलत नाही. भारतासोबतच आयर्लँड फाळणीत ब्रिटिशांची काय भूमिका होती, हे इतिहासात नमूद असल्याचे ते म्हणाले. संघ ब्रिटिशांना कधीच दोष देत नाही.महात्मा गांधी यांनी भगतसिंग यांच्या सुटकेबाबत तत्कालीन ब्रिटिश व्हॉइसरायला दोन पत्रे दिली होती. कारागृहात भगतसिंग यांना भेटायला गेलेल्या त्यांच्या परिवारासोबत जाण्यास ते उत्सुक होते. खुद्द भगतसिंग यांनी गांधीजी यांच्या कार्याची प्रशंसा केली होती. सामान्य माणसास स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करून घेण्याच्या गांधीजींच्या कौशल्याची त्यांनी नोंद लिहून ठेवली आहे. विद्यमान केंद्र सरकार गाझा पट्टीतील हिंसाचाराबाबत काहीच बोलत नाही. केवळ युपीए नेतेच भूमिका मांडतात, अशीही टिपणी जगमोहन सिंह यांनी केली.
संघाने नोंदणी करून घ्यावी – सपकाळ
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, संविधानावर विश्वास असेल तर संघाने प्रथम आपली कायदेशीर नोंदणी करून घेतली पाहिजे. पण ते त्यांना मान्य नाही. त्याचे आचार विचार हे ‘बंच ऑफ थॉट’ नुसार म्हणजेच मनुस्मृतिनुसार चालतात. नागरिक म्हणून साध्या माणसाला आधारकार्ड काढावे लागते. पण हे संघटनेची नोंद करायला तयार नाहीत. डॉ. हेडगेवार यांना भारतरत्न देण्याची मागणी पुढे आली आहे, या पृछेवर बोलतांना सपकाळ यांनी प्रतिप्रश्न केला की सावरकर यांना भारतरत्न देण्याची पण मागणी होती, त्याचे काय झाले ? प्रथम संविधान मूल्यांवर त्यांनी बोलले पाहिजे, असा टोला सपकाळ यांनी लगावला. तुषार गांधी म्हणाले की वर्ध्यातून या यात्रेनिमित्य देशभरात एक संदेश जाणार आहे.
ही पदयात्रा केवळ चालण्याचा कार्यक्रम नसून एक वैचारिक चळवळ आहे. लोकशाहीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे गांधी म्हणाले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, काँग्रेस नेत्या चारूलता टोकस, शैलेश अग्रवाल, शेखर शेंडे, प्रवीण हिवरे, उदय मेघे प्रामुख्याने उपस्थित होते. उद्या गुरुवारी सेवाग्राम येथे विविध वैचारिक सत्र संपन्न होत आहे.