यवतमाळ : शेतकऱ्याने पेरणी केलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे एका तालुका कृषी अधिकाऱ्यास चांगलेच महागात पडले. तक्रार करूनही नुकसानीचा पंचनामा झाला नाही. शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहिला. यासाठी पुसद तालुका कृषी अधिकाऱ्यासह बियाणे कंपनीस जबाबदार ठरवत शेतकऱ्यास नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला. पुसद येथील नारायण रामभाऊ क्षीरसागर यांनी दाखल केलेल्या प्रकरणात हा निर्णय देण्यात आला. त्यांनी पुसद येथील केशव कृषी केंद्रातून रवी ऍग्रो सीड्स कॉर्पोरेशन या कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी केले होते.
हेही वाचा >>> गणेश विसर्जन करून परतणाऱ्या वाहनाला ट्रकची धडक; एक गंभीर, पाच जखमी, संतप्त नागरिकांनी ट्रक जाळला
दोनदा पेरणी करूनही या कंपनीचे बियाणे उगवले नाही. यात बियाणांची खरेदी, लागवड खर्च झाला. पेरणी उशिरा झाल्याने उत्पन्न झाले नाही. या प्रकरणी शेतकरी क्षीरसागर यांनी पुसद तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.परंतु, या तक्रारीची कृषी अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. नुकसानीचा पंचनामाही केला नाही. त्यामुळे या शेतकऱ्याने नुकसानभरपाईकरिता जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेतली. आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे, सदस्य ऍड. हेमराज ठाकूर यांच्या उपस्थितीत या प्रकरणावर सुनावणी झाली. त्यावेळी शेतकरी नुकसानीचा पंचनामा सादर करू शकले नाही. किती नुकसान झाले याचा पुरावा नसल्याने क्षीरसागर यांना अपेक्षित भरपाईला मुकावे लागले. यासाठी पुसद तालुका कृषी अधिकारी जबाबदार असल्याचा ठपका ठेवला. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी क्षीरसागर यांना आर्थिक नुकसान, शारीरिक व मानसिक त्रासापोटी दहा हजार रुपये आणि तक्रार खर्चाचे पाच हजार रुपये द्यावे, रवी एग्रो सीड्स कंपनीने ३९ हजार २०० रुपये भरपाई द्यावी, असे आदेशात नमूद आहे. शेतकऱ्याने दोन लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी केली होती. पुसद तालुका कृषी अधिकायांनी कर्तव्यात कसूर केला असल्याचे आयोगाने निकालपत्रात नमूद केले. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्याला भरपाई द्यावी, असा स्पष्ट निकाल देण्यात आला आहे.