विकासकाकडून ग्राहकांची कोटय़वधींनी फसवणूक
नागपूर : अलाहाबाद बँकेकडे जमीन गहाण असताना सात-बारा कोरा ठेवण्यात आला. ही बाब दडवून हिंगणा तालुक्यातील टाकळघाट येथील या जमिनीवरील प्लॉट्स विक्री करून ग्राहकांची सुमारे पावणेचार कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली, असा आरोप पीडित प्लॉटधारक रमेश तालेवार यांनी आज गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
तालेवार म्हणाले, अष्टविनायक डेव्हलपर्सला ही जमीन गहाण ठेवण्याची परवानगी आणि या जमिनीवर प्लॉट्सची रजिस्ट्री एकाच दुय्यम निबंधकाने केली आहे. या प्रकरणात बँक अधिकारी, दुय्य्म सहायक निबंधक आणि विकासक यांची मिलीभगत आहे. २०१२-१३ मध्ये मे. अष्टविनायक डेव्हलपर्स लक्ष्मीसदा अपार्टमेंट, छत्रपती चौक, नागपूर यांनी वर्तमानपत्रात जाहिरात दिली आणि मोरभवन नागपूर येथे प्रदर्शन लावले. मौजा टाकळघाट येथील ५५ प्लॉट्स असलेला इस्टीम, मौजा तामसवाडी येथील ९३ प्लॉट्स असलेला आयकॉन नावाचा प्रकल्प, चंद्रपूर रोड कार्गो कंटेनर डिपो येथील २०३ प्लॉट्स असलेला डिझायर नावाचा प्रकल्प, बुटीबोरी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या इनोव्हा प्रकल्पातील प्लॉट्स विक्रीसाठी हे प्रदर्शन होते.
मौजा टाकळघाट येथील खसरा क्रमांक १७ब, १७क, १८ अंतर्गत ३.२४ हेक्टर आर. जमिनीवर इस्टीम या प्रकल्पातील भूखंड २०१२ मध्ये ग्राहकांनी नोंदणी केली. १५०० आणि ३००० चौरस फुटांचे प्लॉट्स तीन तीन हप्त्याने १० ते १२ लाख रुपयांत खरेदी करण्यात आले. हिंगणा येथील सहायक दुय्यक निबंधकांच्या कार्यालयात ३५ प्लॉटधारकांना विक्रीपत्र करून देण्यात आले. प्लॉटधारक विकासकाकडे भूखंड विकसित करून देण्याची मागणी करीत होते. पण, त्यांनी ते केले नाही. दरम्यान चार महिन्यांपूर्वी त्यांना अलाहाबाद बँकेची नोटीस आली आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण, त्यांनी खरेदी केलेले प्लॉट्स जमीन विकासकाने गहाण ठेवल्याची ही नोटीस होती. त्यामुळे आता प्लॉटधारकांना बांधकाम किंवा विक्री शक्य नाही. गुंतवणूक म्हणून घेतलेले प्लॉट्स अडचणीच्या वेळी कामी येत नसल्याने ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे. यात अनेक सेवानिवृत्त आहेत. यासंदर्भात तालेवार यांनी बँक अधिकारी यांना जबाबदार धरले आहे. जमिनीवर कर्ज घेतले असताना बँकेने सात-बारावर जमीन गहाण असल्याची नोंद जाणीवपूर्वक केली नाही. पीडितांना सात-बारावर गहाण असल्याची नोंद दिसली असती तर त्यांनी प्लॉट खरेदी केले नसते. यात विकासकासोबत महसूल अधिकारी देखील सहभागी आहेत. हिंगण्याच्या ज्या दुय्यम सहायक निबंधकाने ही जमीन बँकेत गहाण ठेवण्याची परवानगी दिली. त्याच अधिकाऱ्याने त्या जमिनीवरील प्लॉट्चे विक्रीपत्र केले आहे, असा दावाही तालेवार यांनी केला. बँक अधिकाऱ्यांकडून पावणेचार कोटी वसूल करण्यात यावे. अष्टविनायक डेव्हलपर्सचे गिरीश जैस्वाल, अजय जैस्वाल, राजेंद्र गोलाम आणि सहायक दुय्यम निबंधक यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
अष्टविनायक डेव्हलपर्सने ग्राहकांना दिलेला भ्रमणध्वनी क्रमांक ९९२२९१८१२१ आणि राजेंद्र गोलाम यांचा या ८५५०९०८५१८ भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. विकासकाने ग्राहकांना दिलेल्या ई-मेल आयडीवर देखील प्रतिसाद मिळाला नाही.