यवतमाळ : शासनाच्या कोणत्याही विभागात पद भरती करताना आवश्यक शैक्षणिक अहर्तेसोबतच कमाल शैक्षणिक अहर्ताधारकांना प्राधान्याने अर्ज करता येतात. मात्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाने कमाल शैक्षणिक अहर्ताधारकांना नोकरीची दारे बंद केल्याने ओरड सुरू आहे. केवळ पत्रकारितेतील पदविका आणि पदवी धारकांचेच अर्ज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर स्वीकारले जात असल्याने पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग व माहिती जनसंपर्क महासंचालनालयातील समन्वयाअभावी राज्यातील पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदवीधारकांना फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागात २००९ नंतर प्रथमच उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी, सहायक संचालक, अधीपरिक्षक आदी ४० पदांची भरती होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ३० डिसेंबर २०२२ रोजी या पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, जाहिरातीनुसार पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना या पदांसाठी अर्ज करता येत नव्हता. याउलट कोणत्याही शाखेतील पदवी घेतलेले आणि पत्रकारितेत पदवी व पदविका घेतलेले विद्यार्थी या पदांसाठी पात्र ठरले. म्हणजे पत्रकारिता विषयातील उच्च शैक्षणिक अहर्ता असताना विद्यार्थी या पदांसाठी अपात्र ठरले. या जाहिरातीवरून विद्यार्थ्यांनी ओरड सुरू केली.

हेही वाचा – शेतीचे वाद! तीन खुनांनी यवतमाळ हादरले

माध्यमांनी हा विषय लावून धरल्याने लोकसेवा आयोगाने १० एप्रिलरोजी शुद्धीपत्रक काढले. आता २५ एप्रिलपर्यंत या पदांसाठी नव्याने उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

जाहिरातीमधील शैक्षणिक अहर्ता व अनुभवाच्या पात्रतेत नव्याने काढण्यात आलेल्या पत्रकात किरकोळ बदल केले. जुन्या शैक्षणिक अटींमध्ये नव्याने काही पदव्यांचा समावेश केला. मात्र यावेळीसुद्धा आयोगाने ‘पदव्युत्तर पदवीधारक’ विद्यार्थांना डावलले आहे. पदव्युत्तर पदवी शैक्षणिक अहर्तेचा समावेश नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे.

हेही वाचा – नागपूर : महाविकास आघाडीच्या सभेनंतर गोमूत्र शिंपडून भाजपाने केले मैदान शुद्ध!

डिसेंबरमध्ये निघालेल्या जाहिरातीनंतर शैक्षणिक अहर्तेवरून राज्यात ओरड झाल्यानंतरही माहिती व जनसंपर्क विभागाने सुधारित सेवा प्रवेश नियम तयार न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. माहिती व जनसंपर्क विभागात उच्च शैक्षणिक अहर्ताधारकांना डावलून किमान अहर्ताधारकांना अधिक संधी देण्याचा प्रघात जुनाच आहे.

पत्रकारितेत पदविकाधारक अनेक अधिकारी माहिती विभागात मोठ्या हुद्द्यांवर आहेत. त्यामुळे माहिती व जनसंपर्क विभागात पदभरती करताना पत्रकारितेत पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवीधारकांना अर्ज करण्याची सोय व्हावी. या विभागाने आपल्या नियमावलीतच तशी दुरुस्ती करावी आणि हा बदल करून नवीन सेवा नियमानुसार पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी मागणी पदव्युत्तर पदवीधारक विद्यार्थ्यांनी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy of educational qualification in the recruitment of information and public relations department continues nrp 78 ssb
First published on: 17-04-2023 at 14:42 IST