निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पोलीस विभाग सज्ज * पोलीस महासंचालक जयस्वाल यांची माहिती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून राज्यात शांततेत निवडणूक पार पडावी, यासाठी महाराष्ट्र पोलीस तयार आहेत. या काळात नक्षलवादी आणि दहशतवाद्यांच्या धोका लक्षात घेऊन विशेष योजना आखण्यात आली आहे. राज्यात कोणतीही परिस्थिती उद्भवल्यास पोलीस त्याचा सामना करण्यास सक्षम आहेत, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उपराजधानीतील पोलीस जिमखाना येथे आज मंगळवारी विदर्भातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे. यावेळी प्रत्येक जिल्ह्य़ातील पोलीस अधिकाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या व आव्हानांवर चर्चा करण्यात आली आहे.  जयस्वाल म्हणाले, अनेक जिल्ह्य़ांमध्ये मनुष्यबळाचा अभाव जाणवत आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारकडे अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी केली आहे. अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने मनुष्यबळ नेमण्यात येईल. गडचिरोली जिल्ह्य़ात नक्षलवादी दरवेळी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करतात. अनेकदा नक्षलवाद्यांची पोलिसांसोबत चकमकही होते. तिथे शांततेत निवडणूक पार पाडण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. पण, १९९२ ते १९९५ पर्यंत गडचिरोली पोलीस अधीक्षक म्हणून कार्य केल्याचा अनुभव असल्याने गडचिरोलीसाठी विशेष योजना आखण्यात आली आहे. निवडणूक पथकांच्या सुरक्षेसाठी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात येणार आहे.

मुंबईसह पुणे, मालेगाव आदी ठिकाणी यापूर्वी दहशतवादी कारवाया झालेल्या आहेत. तिथेही गुप्तचर माहितीच्या आधारावर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले. त्याचे प्रात्यक्षिकही पार पडले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

शेजारी राज्यांशीही चर्चा

महाराष्ट्रात मध्यप्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यातून शस्त्रांची तस्करी करण्यात येते. नक्षलवाद्यांना शस्त्रपुरवठा करणाऱ्या लोकांनाही दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. या पाश्र्वभूमीवर निवडणूक काळात शस्त्र तस्करी रोखण्यासाठी शेजारच्या राज्यांशी चर्चा करण्यात येत आहे. १५ मार्चला मध्यप्रदेश पोलिसांसोबत चर्चा होणार आहे. शिवाय महाराष्ट्राच्या सीमेवरील परराज्याच्या पोलीस अधीक्षकांशी समन्वय साधण्यात येत आहे. गुप्त माहितीच्या आधारावर तस्करांना जेरबंद करण्यात येईल, याकडेही जयस्वाल यांनी लक्ष वेधले.

समाजमाध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर विशेष नजर

भविष्यातील धोका लक्षात घेऊन व उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. निवडणूक काळात अफवा पसरवून समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने समाजमाध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर विशेष नजर असणार आहे. सायबर गुन्हेगारांवर सायबर सेलच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cop ready to conduct peaceful lok sabha election 2019 dgp subodh kumar jaiswal
First published on: 13-03-2019 at 05:02 IST