नागपूर : उपराजधानीत ‘स्वाईन फ्लू’ (एन १, एच १) वाढतच असून रुग्णसंख्येने शंभरी ओलांडली आहे. त्यातच ‘स्वाईन फ्लू’ आणि कोविड असे दोन्ही आजार असलेल्या दोन रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी एकाचा मृत्यू तर दुसरा स्थिर असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागात चिंता वाढली आहे.

उपराजधानीत गेल्या आठवडय़ात ‘ब्रेन टय़ुमर’ असलेल्या महिला संवर्गातील रुग्णात कोविड आणि ‘स्वाईन फ्लू’ असे दोन्ही आजार असल्याचे आढळले. तिची प्रकृती ‘ब्रेन टय़ुमर’ने आधीच खालावली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हा विषय मृत्यू विश्लेषण बैठकीत पुढे आला. त्यात या महिलेच्या मृत्यूला ‘ब्रेन टय़ुमर’ जबाबदार असल्याचे स्पष्ट झाल्याने हा मृत्यू इतर कारणाने असल्याचे नोंदवले गेले.  एका १७ वर्षीय मुलालाही ‘स्वाईन फ्लू’ आणि कोविड असे दोन्ही आजार असल्याचेही पुढे आले आहे. या रुग्णाची प्रकृती मात्र स्थिर असून त्यावरही उपचार सुरू आहे.

दरम्यान, दिवसभरात शहरातील विविध रुग्णालयांत ‘स्वाईन फ्लू’चे दहा नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील विविध रुग्णालयांत आढळलेल्या ‘स्वाईन फ्लू’ग्रस्तांची संख्या थेट १०३ रुग्णांवर पोहचली. त्यातील ६४ रुग्ण हे शहरी भागातील तर ३९ रुग्ण हे शहराबाहेरचे आहेत.

महापालिकेकडून जनजागृतीसह चाचण्या सुरू

‘स्वाईन फ्लू’ आजारावर नियंत्रणासाठी महापालिकेकडून जनजागृतीसह रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्यांपर्यंत पोहचून त्यांचीही चाचणी केली जात आहे. सोबत रुग्ण आढळणाऱ्या कुटुंबाने घ्यायच्या आवश्यक काळजीबाबतही सूचना केली जात आहे. दरम्यान, हे दोन्ही आजार एकाच व्यक्तीत आढळण्याबाबत एका महिलेची माहिती मिळाल्याचे व तिचा गेल्या आठवडय़ात मृत्यू झाल्याचे एका महापालिकेतील अधिकाऱ्याने कबूल केले. परंतु तिला ‘ब्रेन टय़ुमर’ असल्याने मृत्यूचे कारण दुसरे असल्याचा त्यांचा दावा होता.