मृत्यूचे प्रमाण वाढल्याचा परिणाम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : महापालिकेने शहरातील दहा झोनमध्ये शववाहिकांची व्यवस्था केली आहे. पण करोना व इतर आजारामुळे सर्वाधिक मृत्यू होत असलेल्या भागात शववाहिका मिळण्यासाठी नागरिकांना दोन  ते तीन तास प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

गेल्या काही दिवसात शहरात करोनामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेने रुग्णालयांतून पार्थिव नेण्यासाठी एकूण १६ शववाहिकांची व्यवस्था केली असून २० खाजगी शववाहिका आहेत. दहाही झोनमध्ये प्रत्येकी एक या प्रमाणे १६ पैकी दहा शववाहिका या ठेवण्यात आल्या आहेत. मात्र लक्ष्मीनगर, मंगळवारी, धरमपेठ, हनुमाननगर या झोनमधील अनेक भागात मोठ्या प्रमाणात मृत्यूसंख्या वाढली आहे. त्यामुळे या झोनमध्ये किमान २ ते ३ शववाहिका ठेवणे आवश्यक आहे. पण त्या ठिकाणी केवळ एकच शववाहिका आहे. अशावेळी दुसऱ्या झोन कार्यालयात संपर्क साधून तेथील शववाहिका मागवली तरी ती मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

विशेषत: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात करोनामुळे मृतांना गंगाबाई घाट किंवा मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कारासाठी नेले जाते. अशात धंतोली , हनुमान आणि गांधीबाग झोनमध्ये अधिक शववाहिका ठेवणे आवश्यक असूनही केवळ  एक किंवा दोन शववाहिका आहेत.

शववाहिका जर पार्थिव आणण्यासाठी गेल्यास दुसऱ्या झोनमधील शववाहिका मागवली जाते. पण त्या झोनमधील कर्मचारी शववाहिका पाठवत नाही. त्यामुळे घाटावर पार्थिव नेण्यासाठी लोकांना प्रतीक्षा करावी लागते. शहरात मृत्यूची संख्या वाढत असताना शववाहिकांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

शहरात महापालिकेच्या १० आणि नव्याने पुन्हा तयार केलेल्या सहा शववाहिका आहेत. प्रत्येक झोनमध्ये व्यवस्थेच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. मात्र मागणी असल्यास नियंत्रण कक्षात किंवा संबंधित झोनमध्ये संपर्क साधल्यास तात्काळ शववाहिका उपलब्ध केली जाईल. कुठेही पार्थिव नेण्यासाठी सध्या तरी प्रतीक्षा करावी लागत नाही.  – प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी महापालिका

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus infection other disease patient two hours waiting in ambulance akp
First published on: 09-04-2021 at 00:02 IST