अमरावती: तिवसा येथे राहणाऱ्या एका ५५ वर्षीय सराफा व्यावसायिकाच्या घरात शिरून हत्‍या करण्‍यात आली. त्यानंतर मारेकऱ्यांनी त्याच्या घरातील सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना सोमवारी रात्री उघड झाली.

संजय भगवंतराव मंडळे (५५, रा. तिवसा) असे मृताचे नाव आहे. मंडळे हे सराफा व्यावसायिक असून तिवसा शहरातच त्यांचे दुकान आहे. दरम्यान सोमवारी दुपारी मंडळे यांचा मुलगा व पत्नी हे दोघे रुग्णालयात काम असल्यामुळे अमरावतीत आले होते. तसेच काही महिन्यांपूर्वी संजय मंडळे यांचा अपघात झाला होता, त्यामुळे सध्या ते घरीच राहत होते.

हेही वाचा… दिवसा रेकी, रात्री चोरी! यवतमाळ जिल्ह्यात दीड हजारांवर चोरी, घरफोडीचे गुन्हे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी रात्री मंडळे यांचा मुलगा व पत्नी अमरावतीतून घरी पोहोचले तर त्यांना धक्काच बसला. घराचा दरवाजा उघडा होता आणि संजय मंडळे रक्ताच्या थारोळ्यात हॉलमध्ये पडून होते. तत्‍काळ या घटनेची माहिती पोलिसांना देण्‍यात आली. पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठले.
मंडळे यांची दागिने ठेवलेली बॅग त्यांच्या कुटुंबीयांनी पाहिली असता, ती कुठेही दिसून आली नाही. त्यामुळे मारेकऱ्यांनीच ती पळवल्याचा अंदाज व्यक्त करून सोने लुटण्यासाठीच ही हत्‍या झाल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामीण पोलिसांनी वर्तवला आहे. बॅगमध्ये नेमके किती सोने होते, मारेकऱ्यांनी लूट करण्यासाठीच खून केला की अन्य काही कारण आहे, याबाबत पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे.