कविता नागापुरे

भंडारा : महाविकास आघाडीमध्ये कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. सर्वे एकमेकांच्या जागेवर उमेदवार घोषित करत आहेत. वंचित आणि महाविकास आघाडीत काय झालं? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यासंदर्भात मला काहीही बोलायचं नाही. आम्ही उद्धव ठाकरेंचा खूप वर्षे अनुभव घेतला आहे. आम्हाला याची सवय आहे. काँग्रेसला त्यांच्यासोबत राहायचं असेल तर त्यांनाही सवय करून घ्यावी लागेल. कारण ते असचं वागतात, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील मेंढे यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्ताने झालेल्या जाहीर सभेनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले.ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी १७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यापैकी सांगली आणि उत्तर पश्चिम मुंबई या दोन जागांवरील उमेदवारांवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. या दोन्ही जागांवर काँग्रेसचा दावा होता. विशेष म्हणजे, सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम हे दिल्ली पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी गेले आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडेच राहावी, अशी विनंती विश्वजीत कदम यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

हेही वाचा >>>‘ईव्हीएम’ऐवजी ‘बॅलेट पेपर’वर मतदान घेतल्यास निवडणूक ड्युटी करतो! प्राध्यापकाच्या व्हायरल पत्राची समाजमाध्यमांमध्ये चर्चा 

ठाकरे गटाकडून सांगली लोकसभा मतदारसंघासाठी डबल महाराष्ट्र केसरी विजेते चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झालीय. या जागेवरुन काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी आक्षेप घेत ते आक्रमक झाले आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीसोबत न जाता ‘एकला चलो’चा नारा दिला. या घडामोडी पाहून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे. महाविकास आघाडीतून अनेक लोकं बाहेर पडतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला आहे.