अमरावती : जिल्‍ह्यातील संत्रापट्ट्यात आंबिया बहराची तोडणी सुरू झाली असून परराज्‍यांतूनही व्‍यापारी दाखल झाले आहेत. पण, सध्‍या फळ बागायतदार फळगळतीच्या समस्येने जेरीस आले आहेत. विदर्भातील एकूण एक लाख हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत ७५ हजार हेक्‍टरमध्‍ये लागवड ही अमरावती जिल्ह्यात आहे. आंबिया बहार घेणारे ६० टक्‍के तर उर्वरित ४० टक्‍के मृग बहाराचे नियोजन करतात. आंबिया बहार घेणाऱ्यांची संख्या मोठी असतानाच सध्या लिंबाच्या आकाराची फळे असलेल्या बागेत फळमाशीमुळे गळ होत आहे.

फळगळतीमुळे यंदा उत्पादकता प्रभावित होण्याची भीती आहे. कृषी विद्यापीठाकडून याबाबत उपाययोजना राबविण्यासाठी जागृतीवर भर दिला जात आहे. मात्र अपेक्षित नियंत्रण अद्यापही साध्य झाले नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत.अनेक संत्रीबागांमध्‍ये पावसाचे पाणी साचले आहे. त्‍यामुळे घातक बुरशीचा प्रादुर्भाव होण्‍याचा धोका आहे. फळमाशीची उत्‍पत्‍ती रोखण्‍यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. बोरांच्या आकाराची ही फळे आहेत. आंबिया बहारातील फळांची गळ ही फळमाशीमुळे होत आहे. अन्नद्रव्य व्यवस्थापन, बागेतील पाण्याचा निचरा या बाबींवर भर द्यावा, असा सल्‍ला कृषीतज्‍ज्ञांनी दिला आहे.