नागपूर : हवामान बदलाचा प्रचंड तडाखा महाराष्ट्रालाच नाही तर जवळजवळ सर्वच राज्यांना बसत आहे. मोसमी पावसाची वाटचाल सुरू झाली असताना अवकाळी पावसाचा जोर काही थांबला नाही, पण त्याचवेळी नवतपा सुरु होण्याआधीच महाराष्ट्रात आणि विशेषकरून विदर्भात दररोज तापमानाचा नवा उच्चांक नोंदवला जात आहे. आता चक्रीवादळाचे नवे संकट देशावर घोंगावत आहे.

केरळमध्ये पोहोचल्यानंतर मोसमी पाऊस महाराष्ट्रात येतो. अंदमानमध्ये तो पोहोचल्यानंतर केरळ आणि त्यानंतर महाराष्ट्रातील मोसमी पावसाच्या आगमनाला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच आता “रेमल” या चक्रीवादळाने भारताकडे आपला मोर्चा वळवला आहे.

हेही वाचा – लोकसभेच्या निकालापूर्वीच विधानसभेसाठी सर्वेक्षण? खासगी कंपन्या सक्रिय

केरळ आणि महाराष्ट्रातील मोसमी पावसाची प्रतीक्षा जवळजवळ संपल्यात जमा असताना या चक्रीवादळाने पुन्हा एकदा हवामानाचे गणित पालटले आहे. या चक्रीवादळामुळे मोसमी पावसाच्या वाटचालीवर परिणाम होत आहे. आतापर्यंत वेगाने वाहू लागलेल्या मोसमी पावसाची वाटचाल आता संथावली आहे.

सध्या केरळमध्ये मोसमी पाऊस ३१ मे च्या आसपास दाखल होऊ शकतो. तर, महाराष्ट्रात १० ते ११ जूनच्या तो दाखल होऊ शकतो. मात्र, हवामानाचे पालटलेले चक्र पाहता या आगमनाला विलंब देखील होऊ शकतो. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार काही तासातच हे चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

परिणामी पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यात मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. येत्या २४ तासात चक्रीवादळामुळे हवामानावर आणखी परिणाम दिसून येतील. महाराष्ट्रावर मात्र या चक्रीवादळाचा थेट परिणाम होणार नसल्याचे भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. याउलट विदर्भ तसेच उत्तर मध्य महाराष्ट्राला २७ मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांपासून विदर्भ प्रचंड तापला आहे. विदर्भातील तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या जवळ जाऊन पोहोचले आहे. त्यातच आजपासून म्हणजे २५ मेपासून नवतपाची सुरुवात झाल्यामुळे तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे वैदर्भीय होरपळून निघाला आहे. दिवसाच नाही तर रात्रीदेखील उष्ण वारे वाहत आहेत. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.

हेही वाचा – मद्याप्राशनाचे नेमके वय किती? नियमाच्या माहितीअभावी संभ्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचवेळी राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता नाकारता येत नाही, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. मराठवाडा, दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळेल. तर महाराष्ट्राच्या राजधानीत काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे.