‘डिप्लोमा इन फार्मसी’ अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया वेळापत्रकात तंत्र शिक्षण संचालनालयाने मुदतवाढ दिली आहे. या अभ्यासक्रमात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ०३ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. सर्वत्र झालेली अतिवृष्टीमुळे अनेक विद्यार्थी प्रवेश नोंदणीपासून वंचित राहिल्याने प्रवेश प्रक्रियेत नोंदणीसाठी मुदतवाढ करण्याची मागणी राज्यभरातून होत होती. त्यामुळे तंत्र शिक्षण संचालनालयाने यापूर्वी २४ जुलैच्या अंतिम तारखेत ११ दिवसांची वाढ करून ती ३ ऑगस्ट केल्याची माहिती महात्मा फुले फार्मसी कॉलेजचे अध्यक्ष डॉ. सुधीर ढोणे यांनी दिली. डिप्लोमा इन फार्मसी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षण संचालनालय (डीटीई) यांच्या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज करावा लागतो. भरलेल्या अर्जाची मुळ कागपत्रासह पडताळणी करून घेण्यासाठी एफसी केंद्र किंवा ऑनलाईन ‘इ-स्क्रुटिनी’ करणे आवश्यक आहे. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात संकेतस्थळावर यादी जाहीर होईल. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी आणि जातीच्या प्रवर्ग निहाय गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर होईल. अकोल्यातील प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन डॉ.सुधीर ढोणे यांनी केले.