नागपूर:  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील स्मृति मंदिर परिसरात मागील तीन दिवसांपासून अखिल भारतीय वार्षिक प्रतिनिधी सभा सुरू आहे. या सभेमध्ये पहिल्या दिवशी सरकार्यवाह यांनी वार्षिक अहवाल मांडला, तसेच राम मंदिराच्या प्रस्तावावरही चर्चा करण्यात आले नागपुरात दर तीन वर्षांनी होणाऱ्या वार्षिक प्रतिनिधी सभेला एक विशेष महत्त्व आहे. या सभेमध्ये संघामध्ये सरसंगचालकानंतर दुसरे महत्त्वाचे पद असलेल्या  सरकार्यवाह या पदाची निवडणूक केली जाते. त्यामुळे यंदाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत विद्यमान सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांची निवड होणार की नव्या चेहऱ्याला संधी मिळणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता लागली होती.

प्रतिनिधी सभेच्या शेवटच्या दिवशी सकाळी सरकार्यवाह पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये विद्यमान सर कार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. संघाच्या प्रतिनिधी सभेमध्ये सरकार्यवाह यांची निवड ही निवडणूक पद्धतीने केली जाते. मात्र यासाठी सामान्य निवडणूक ही सारखी प्रक्रिया राबवली जात नसून प्रतिनिधी सभेतील एखादी प्रमुख व्यक्ती नावाची सूचना करतो, त्यानंतर त्या नावाला समर्थन आणि अनुमोदन दिले जाते. यात कोणीही प्रतिस्पर्धी असतो असेही नाही. दत्तात्रेय होसबळे यांची पुन्हा निवड झाल्याने ते आता तीन वर्षे या पदाचा कार्यभार सांभाळतील. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी या निवडीसाठी होसबळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

हेही वाचा >>>दानपेटीत टाकली पेटती अगरबत्ती, देणगीची रक्कम स्वाहा; कुठे घडला हा प्रकार? वाचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १५ ते १७ मार्च दरम्यान नागपुरातील संघाच्या स्मृती मंदिर परिसरात सुरू आहे. राम मंदिर निर्माणानंतर त्यासंदर्भातील पुढील योजना, संघाचे शताब्दी वर्ष, शाखांचा विस्तार अशा महत्त्वाच्या विविध प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली.  सरसंघचालकांनंतर दुसरे महत्त्वाचे पद असलेल्या सरकार्यवाह पदाची निवडणूक हे या बैठकीचे वैशिष्ट होते. मागील ९९ वर्षांपासून संघ समाजामध्ये काम करत आहे. २०२५च्या विजयादशमीला संघाला शंभर वर्ष पूर्ण होणार असल्याने हे महत्त्वाचे वर्ष ठरणार आहे. बैठकीला संघाच्या ३२ संघटनांचे प्रमुख, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, भाजपचे अध्यक्ष, संघटन मंत्री असे देशभरातून १५२९ कार्यकर्तांची उपस्थित होते.