अकोला : अत्यंत विषारी दोन मण्यार सापांमध्ये जीवघेणी झुंज सुरू होती. हे दृश्य पाहून सर्वांच्या जीवाचा थरकाप उडाला. ज्येष्ठ सर्पमित्र बाळ काळणे यांनी जोखमीने त्या दोन्ही जहाल विषारी सापांना बरणीमध्ये बंद केले. त्यामुळे उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या घटनेचे चित्रफीत समाज माध्यमांमध्ये चांगलीच प्रसारित झाली आहे.

शहरातील वाशीम बायपास मार्गावर एका बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास दोन सापांमध्ये झुंज सुरू होती. परिसरातील नागरिकांना हे दृश्य दिसून आले. सापांची झुंज पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. या घटनेची माहिती ज्येष्ठ सर्पमित्र बाळ काढणे यांना देण्यात आली. बाळ काढणे यांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. त्यांनी पाहणी केल्यावर ते दोन्ही साप मण्यार या अत्यंत विषारी जातीचे असल्याचे समोर आले. मण्यार जातीचे साप हे इतर छोट्या सापांना देखील खातात. यावेळी सुद्धा मोठा मण्यार साप हा लहान मण्यार सापाला खाण्याचा प्रयत्न करीत होता. यातूनच दोन्ही मण्यार सापांमध्ये जीवघेणी झुंज सुरू होती. सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी कौशल्यपूर्ण व अत्यंत शिताफीने दोन्ही सापांना पकडून बरणीमध्ये बंद केले. या दोन्ही सापांना पकडल्यामुळे परिसरातील नागरिकांवरील मोठे संकट टळले आहे. विषारी मण्यार हा इतर साप खातो. अत्यंत बारीक दात असल्यावरही त्याची पकड फार मजबूत असते. त्यामुळे दुसरा साप तावडीतून सुटणे शक्य नसते. आशिया खंड व भारतातील सर्वात जास्त विषारी हा मण्यार साप असल्याची माहिती सर्पमित्र बाळ काळणे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा…अविवाहित मुलीला वडिलांकडून पोटगी मिळू शकते? न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय….

जखमी सायाळला जीवदान

शहरातील राष्ट्रीय महामार्गावर जखमी अवस्थेत सायाळ आढळून आले होते. पोलिसांनी याची माहिती वन विभागाला दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी घटनास्थळ गाठून जखमी सायाळला पकडून गाडीत ठेवले. त्याच्यावर पशू वैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. सायाळ जमिनीत राहणारा वन्यजीव आहे. याचे नख, दात तीक्ष्ण असून संपूर्ण अंगावर दीड ते दोन फूट काटे असतात. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हा तिन्हीचा उपयोग करतो. त्यामुळे कोणताही वन्यजीव त्याच्या जवळ जात नाही, असे बाळ काळणे यांनी सांगितले.