नागपूर : भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्धीकी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाले आहे. त्यासोबत सिद्धीकी यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुरुपूजन कार्यक्रमातील उपस्थितीचे छायाचित्रही जोडण्यात आले आहे. त्यामळे संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याच्या संतापातून धमकी पाठवली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : नागपूर: अजित पारसेला अटक करण्यास पोलिसांची टाळाटाळ, वारंवार आत्महत्या करण्याचे नाटक

सिद्धीकी हे भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्याचे नवीन सुभेदार ले आऊट, बसेश्वर पुतळ्याजवळ जनसंपर्क कार्यालय आहे. २० ऑक्टोबरला सिद्धीकी यांचे स्वीय सहायक प्रशांत हे कार्यालयात गेले. येथे त्यांना एक लिफाफा दिसला. त्यात धमकी पत्र होते. ‘तू आरएसएसचा दलाल झाला आहे. तुम्ही इस्लामला बदनाम केले. जमाल सिद्धीकी यांचे शीर धडापासून वेगळे केले जाईल’ असे नमूद करण्यात आले आहे. त्याच बरोबर पत्रासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुरुपूजन कार्यक्रमातील छायाचित्रे जोडण्यात आली होती. याबाबत. सिद्धीकी यांच्या सूचनेवरून प्रशांत यांनी सक्करदरा पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.