वाशीम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या शिक्षणसंस्थेत गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत असलेले कैलास इंगोले यांनी २० मार्च रोजी रेल्वेसमोर उडी घेऊन जीवन संपवले. याप्रकरणी संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत कैलास इंगोले यांच्या पत्नी जोत्स्ना कैलास इंगोले यांनी जऊळका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे पती कैलास इंगोले राष्ट्रीय विद्यालय मसला ता. मालेगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. मागील २३ वर्षांपासून संस्थाध्यक्ष सत्यानंद कांबळे, सिद्धार्थ कांबळे, त्यांचा भाचा सचिन अढागळे, मुख्याध्यापक विष्णू कांबळे हे नेहमी कैलास इंगोले यांना शिक्षण सेवकाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नोकरीत कायम करण्यासाठी दहा लाखाची मागणी करून त्यांचा मानसिक छळ करीत होते. अखेर या जाचाला कंटाळून कैलास इंगोले (रा. अल्लाडा प्लाट वाशीम) यांनी २० मार्च रोजी जोडगव्हाण ते मसला दरम्यान रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी दोषीवर कडक कारवाई करून लवकरात लवकर अटक करू, अशी माहिती प्रभारी ठाणेदार मोरे यांनी दिली.