नागपूर : सत्तेत असून देखील पदाधिकाऱ्यांचे काम होत नाही, संपर्क प्रमुख फोन घेत नाही, असा तक्रारीचा पाढा वाचणाऱ्या पदाधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओरड करण्यापेक्षा काम कसे करवून घेता येईल हे शिकून घ्यावे, अशा शब्दांत झापले.
अजित पवार आज विदर्भ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शहर राष्ट्रवादी काँग्रेसची गणेशपेठ येथील कार्यालयात बैठक घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या तोंडावर ही बैठक महत्वाची होती. या बैठकीत नागपुरातील पदाधिकाऱ्यांनी काम होत नसल्याची तक्रार केली. त्यावर पवावर यांनी ओरड करण्यापेक्षा काम कसे करवून घेता येईल हे बघावे. काम केले तर मते मिळतात, असे नाही तर तुम्ही कोणता मुद्दा उचलला हे पण महत्वाचे आहे, असे सांगत चांगले कार्यकर्ते हेरा व कामाला लागा,अ सा स्पष्ट शब्दात सल्ला दिली.
या बैठकीत शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी पक्षाची शहरातील स्थितीबद्दल सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत असूनही नागपुरात महापालिका आयुक्त, पोलीस प्रशासन राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटत नाही. ते समस्या घेऊन गेल्यावरही त्याची दखल घेत नाहीत. राष्ट्रवादीचे मंत्री नागपुरात येतात मात्र, ते पदाधिकाऱ्यांना कळवत नाहीत. आम्हाला वाळीत टाकल्यासारखे वागवतात.
माजी आमदार राजेंद्र जैनही आमचे फोन घेत नाही, अशा सर्व तक्रारी प्रशांत पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे मांडल्या. आगामी महापालिका निवडणूकीत पक्षाला ४० जागा मिळायला हव्या, अशी मागणीही केली. त्यानंतर अजित पवार यांनी पक्षाच्या उपस्थिती पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना चांगलेच फैलावर घेतले. शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी काही प्रश्न मांडले ते गंभीर आहेत असे सांगताना पवार म्हणाले, राजकीय जीवनात काम कसे करून घ्यायचे याचे काही नियम आहेत. नागपुरात विजयगड हे माझे शासकीय निवासस्थान आहे. शासकीय बंगल्यावर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्टाफ ठेवण्यात आला आहे. मात्र, त्यांच्याकडून कळले की कार्यालयात पक्षाचे पदाधिकारी लोकांची कोणतीही कामे घेऊन येत नाही. असे राहिले तर कसे होईल असा संतापही अजित पवारांनी व्यक्त केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या नागपूर दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांचे कान टोचले आहे. राष्ट्रवादी दोन गटात विभागली गेल्यानंतर विदर्भात राष्ट्रवादी बळ अत्यल्प आहे. त्यात नागपूर शहरात तर पक्ष संघटना जेमतेम आहे. अजित पवारांनी आपल्या स्टाईलमध्ये पदाधिकाऱ्यांना झापल्याने त्यांचे मनोबल खचण्याची चिन्हे आहेत.