नागपूर : ‘नेमेची येतो पावसाळा…’ याप्रमाणे दरवर्षी मकरसंक्रांत येते. त्यानिमित्ताने नायलॉन मांजा आणि प्लास्टिकचे पतंग बाजारात सर्रास विकले जातात आणि दरवर्षी मांजामुळे माणसे व पशुपक्षी जखमी होतात. कुणाचा तरी बळी जातो, ओरड झाल्यावर मांजा विक्रेत्यांवर थातूरमातूर कारवाई केली जाते आणि हे चक्र दरवर्षी असेच अव्याहतपणे सुरू राहते. न्यायालयाच्या दणक्यानंतर उपराजधानीत यावर्षी कारवाईचा वेग वाढला असला तरीही मकरसंक्रांतीच्या अवघ्या पाच-सहा दिवसांपूर्वी आधी पोलीस व महापालिकेची यंत्रणा कामी लागली. त्यामुळे या कारवाईचा सकारात्मक परिणाम दिसून येत नाही.

नायलॉन मांजा, चायनिज मांजा आणि प्लास्टिक पतंग यांच्या वापरावर पूर्णपणे प्रतिबंध आहे. तरीही सर्रासपणे मांजा व प्लॅस्टिक पतंग विकल्याच जातात. प्रतिबंधित मांजा व्यवसायात दरवर्षी होणारी उलाढाल ही कोट्यवधींची आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वीच काही महिन्यांआधी त्याचा साठा करून ठेवला जातो. तो चोरून लपून विकला जातो. जोपर्यंत कोणाचा तरी मांजामुळे गळा कापला जात नाही तोपर्यंत कारवाई सुरुच होत नाही. दरवर्षी कारवाईचा बडगा हा सणांची बाजारपेठ सजल्यानंतरच उगारला जातो. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असो किंवा प्रतिबंधित फटाके असो कारवाईला सुरुवात विक्री सुरू झाल्यावरच होते.

हेही वाचा >>> नागपूर : नायलॉन मांजाची ऑनलाइन विक्री तात्काळ थांबवा, उच्च न्यायालयाचे आदेश

मात्र, मकरसंक्रांतीला पर्यावरण प्रदूषणापेक्षाही माणूस आणि पशुपक्षी यांच्या जीवाची जोखीम अधिक असते. नायलॉन मांजा आणि प्लास्टिक पतंग विक्रीसंदर्भात न्यायालयाचे देखील निर्देश आहेत, पण ते डावलून सर्रासपणे हा माल बाजारात येत आहे. नऊ जानेवारीपासून सुरू झालेल्या कारवाईदरम्यान आतापर्यंत सुमारे ३५० प्लास्टिक पतंग जप्त करण्यात आल्या आहेत. नायलॉन मांजावर राष्ट्रीय हरित लवादने देखील बंदी घातली आहे. तरीही विक्री थांबली नाही. विक्रीसाठी ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’ तयार करून त्या माध्यमातून घरपोच मांजा व पतंग पोहोचवण्याची नवी युक्ती शोधण्यात आली आहे, हे सर्वांना माहिती असूनही कारवाई करणारी यंत्रणा डोळेबंद करून राहते हे चित्र दरवर्षीचे आहे.

हेही वाचा >>> ‘‘भाजपने शिंदे गटाला एकही जागा दिली नाही’’; नाना पटोले यांची टीका, म्हणाले “ते सत्तेत फक्त….”

येथे होते विक्री…

मोमीनपुरा, जागनाथ बुधवारी, हसनबाग, जुनी शुक्रवारी, खामला ही नागपूर शहरातील नायलॉन मांजा आणि पतंग विक्रीची मोठी केंद्र आहेत. या केंद्रातून शहरात विविध ठिकाणी हा माल विक्रीसाठी पोहचवला जातो. दरवर्षी या व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होते. जागनाथ बुधवारी परिसरात पतंग तयार होतात. तर जुनी शुक्रवारीत किरकोळ विक्रीची ४० हून अधिक दुकाने थाटली आहेत. तर शहरात काही ठिकाणी माल तयार होत असला तरीही बरेलीतून चक्री, गुजरात, कोलकाता अशा काही शहरांमधून पतंग विक्रीसाठी येतात.

हेही वाचा >>> नागपूर : अर्ज भरताना गाणारांसोबत भाजपचा एकही बडा नेता नाही

कारवाई सुरू असल्याचा दावा

न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे शाखा आणि महापालिकेच्या उपद्रव शोध पथकातील कर्मचारी एकत्रितपणे ही कारवाई करत आहेत. नुकतेच पतंग उडवणाऱ्या मुलांकडून देखील नायलॉन मांजा व प्लास्टिक पतंग जप्त करण्यात आली असून, एक गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. मकरसंक्रांत संपेपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार, असे उपद्रव शोध पथकाचे वीरसेन तांबे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निर्मितीच बंद करावी

बंदी असणारी कोणतीही वस्तू विक्रीसाठी येत असेल तर ती विकली जाणारच आहे. त्यामुळे कितीही कारवाया केल्या तरी त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे एक तर त्या वस्तूंची निर्मिती प्रक्रिया थांबवली पाहिजे, इतर राज्यातून त्या येत असतील तर त्या शहराच्या सीमेवरच थांबवायला हव्या. दोन महिने आधीपासूनच या सर्व प्रक्रियांना सुरुवात होते हे माहीत असतानाही ऐनवेळी कारवाई केली जाते, ज्याचा काहीच परिणाम होत नाही. मग पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ अशी स्थिती निर्माण होते.

– ग्रीनव्हिजिल चमू