नागपूर: भाजप सरकारच्या काळात देशात बेरोजगारी वाढल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातो. राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये ही रोजगाराचा प्रश्न चर्चेत राहिला. याचा धसका भाजप नेत्यांनी घेतलेला दिसतो. शुक्रवारी नागपूर येथे झालेल्या रोजगार मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संपूर्ण भाषण रोजगार केंद्रित होते. त्यामुळे हा भारत जोडो यात्रेचा धसका आहे की काय अशी चर्चा मेळाव्यात सहभागी युवकांमध्ये होती.
फडणवीस म्हणाले, आपला देश हा सर्वाधिक तरुणाई असलेला देश आहे. ३५ वर्षाखालील लोकसंख्येचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ६५ टक्के आहे. देशाच्या विकासात तरुणाईचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. २०१४ पूर्वी दहाव्या स्थानावर असलेली आपली अर्थव्यवस्था आता पाचव्या क्रमांकावर आली आहे. लवकरच ती तिसऱ्या स्थानावर येईल. रोजगाराशिवाय अर्थव्यवस्था विस्तारित होऊ शकत नाही राज्य सरकारच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचा प्रयत्न होत आहे. कुठल्याही रोजगार निर्मिती उपक्रमाला, मेळाव्याला राज्य सरकारचे संपूर्ण सहकार्य, पाठिंबा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
