scorecardresearch

शताब्दी वर्षांनिमित्त विदर्भ साहित्य संघास दहा कोटी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

विदर्भ साहित्य संघ व साहित्य महामंडळ यांचे मराठीच्या संवर्धनात अभिमानास्पद कार्य असल्याचा गौरव उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

शताब्दी वर्षांनिमित्त विदर्भ साहित्य संघास दहा कोटी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोटो- लोकसत्ता

प्रशांत देशमुख, लोकसत्ता

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी, वर्धा : विदर्भ साहित्य संघाला १०० वर्षे पूर्ण झालीत. यानिमित्त विदर्भ साहित्य संघास दहा कोटी रुपये राज्य शासनातर्फे दिले जातील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज, रविवारी सकाळी ते बोलत होते. या प्रसंगी डॉ. विनय सहस्रबुद्धे, खा. रामदास तडस, खा. डॉ. अनिल बोंडे, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावर, आ. समीर मेघे तसेच कार्याध्यक्ष प्रदीप दाते व सागर मेघे यांची उपस्थिती होती.

या वेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणामुळे मराठी भाषेची चिंता संपेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या शैक्षणिक धोरणात भाषांना नवी दिशा देण्याचे सामर्थ्य आहे. मराठी ज्ञानभाषा आहेच. आता सगळय़ाच प्रकारचे शिक्षण मराठीतून मिळेल. परिणामी मराठी व्यवहारातील ज्ञानभाषा होईल. त्यामुळे मराठीबाबत व्यक्त होत असलेली चिंता पुढे राहणार नाही.  संमेलनात राजकारणी काय करतो, असा प्रश्न सर्वाना पडतो. मलाही पडतो. पण, आम्ही अनेक साहित्यिकांची प्रेरणा आहोत. आमच्यातही साहित्यिक आहेत. या पवित्र मंचावर थोडी जागा मिळाली, तरी ती व्यापून टाकण्याचा प्रयत्न करतो, अशी कोटीही त्यांनी केली.    विदर्भ साहित्य संघ व साहित्य महामंडळ यांचे मराठीच्या संवर्धनात अभिमानास्पद कार्य असल्याचा गौरव उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. त्यांच्या हस्ते या कार्यक्रमात ‘वरदा’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

घोषणाबाजीचा धसका

उद्घाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान जोरदार घोषणाबाजी झाली होती.  रविवारी सकाळच्या सत्रात एका परिसंवादादरम्यानच उपमुख्यमंत्र्यांचे भाषण होणार होते. परंतु, पोलिसांनी साहित्यप्रेमींची वाटच अडवून धरली होती. परिणामी. गांधी विनोबांवरील महत्त्वाच्या परिसंवादाला श्रोते बाहेर उभे आणि आत खुर्च्या रिकाम्या असे विसंगत चित्र होते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 04:27 IST
ताज्या बातम्या