शिक्षक भरतीसाठीच्या टीईटी परिक्षेतील घोटाळ्याचा मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले. टीईटी परिक्षेतील घोटाळ्याचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. सरकारमधील मंत्र्यांच्या घरातील मुली शिक्षक म्हणून नोकरीला लागल्या आहेत. सत्तेचा गैरवापर करुन कोणाला लाभ दिला जात असेल, तर हे नियमात बसत नाही, असा हल्लाबोल अजित पवारांनी करत मंत्री अब्दुल सत्तार यांना लक्ष्य केलं.

अजित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर देत महाविकास आघाडीच्या काळातील घोटाळा असल्याचं सांगितलं. “टीईटी घोटाळा कोणाच्या काळात झाला, तेव्हा कोणाचं सरकार होतं. महाविकास आघाडीचं सरकार असताना राज्यातील लाखो तरुणांना बुडवणारा टीईटी घोटाळा झाला. सनदी अधिकाऱ्यापासून सर्व लोक टीईटी घोटाळ्यात सामील होते. टीईटी घोटाळ्याप्रकरणी मंत्रालयातील अधिकाऱ्यांना अटकही झाली,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

हेही वाचा : ‘मुंबईत २० टक्के कन्नडभाषिक राहतात’ म्हणणाऱ्या कर्नाटकच्या मंत्र्यावर फडणवीस संतापले, म्हणाले “कोणाच्या बापाची…”

“टीईटी घोटाळ्यावरून अब्दुल सत्तारांवर आरोप करण्यात येत आहे. पण, त्यांची कोणतीही मुलगी टीईटीअंतर्गत नोकरीला लागली नाही. टीईटी आयुक्तांनी तसा खुलासा केला आहे. पण, कोणत्याही मंत्र्यावर बेछूट आरोप करून निघून जायचं. मात्र, आम्ही सोडणार नाही, तसेच उत्तर देऊ,” असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना दिला आहे.

हेही वाचा : “मुंबईत २० टक्के कन्नड भाषिक, मुंबईला केंद्रशासित करा”, कर्नाटक मंत्र्याचा अजित पवारांकडून खरपूस समाचार, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हा पहिला विरोधी पक्ष आहे, जो स्वत:च्या काळातील गोष्टीच भ्रष्टाचार म्हणून बाहेर काढत आहे. बॉम्ब-बॉम्ब म्हटलं आणि लवंगी फटाकडी सुद्धा यांना सापडत नाही आहे. अपात्र कंपनींना पात्र करुन टीईटी परिक्षा कोणी घेतली, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित करत महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं.