अमरावती : येथील अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडले. यावेळी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केलेल्या एका वक्तव्यामुळे सभागृहात चांगलाच हशा पिकल्या.

मुख्यमंत्री म्हणाले, अभिनंदन बँकेचे अध्यक्ष ॲड विजय बोथरा हे सातत्याने अध्यक्षपदी अविरोध निवडून येतात. २१ वर्षांपासून ते अध्यक्ष आहेत. आम्हाला तर दर पाच वर्षांनी निवडणुकांना सामोरे जावे लागते. २१ वर्षे तुम्हालाच कसे अध्यक्ष राहता येते, याचे काही गणित तुमच्याकडे असेल, तर ते आम्हालाही समजून सांगावे. पण, २१ वर्षे पदावर राहून इतके गुणवत्तापूर्ण काम करणे, हे अत्यंत महत्वाचे आहे.

 मात्र आता लगेच आमचे माध्यमांचे लोक फडणवीसांना २१ वर्षे मुख्यमंत्रीपदी राहण्याचे वेध लागले वगैरे, असे चालू करतील. पण, मला ते वेध लागलेले नाहीत. पण, सगळ्यांना सोबत घेऊन अशा पद्धतीने बँक कशी चालवता येते, हे बोथरा यांच्याकडून शिकायचे आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अर्बन बँकांचे मोठे जाळे तयार झाले. या दोन्ही राज्याच्या विकासामध्ये अर्बन बँकांचा मोठा सहभाग आहे. जोपर्यंत आर्थिक सक्षमता येत नाही, जोपर्यंत आर्थिक अधिकारिता येत नाही, तोपर्यंत आर्थिक विकास होऊ शकत नाही.

सामाजिक, आर्थिक विकासाच्या चक्रामध्ये आर्थिक संस्थांचे महत्व फार मोठे आहे. लोकांच्या कार्यक्षमतेचा, संकल्पनांचा उपयोग या संस्थांच्या माध्यमातून केला जाऊ शकतो. एखादा व्यवसाय उभा करायचा असतो, तेव्हा केवळ क्षमता असून चालत नाही, तुमच्यावर विश्वास ठेवून जोपर्यंत तुम्हाला कुणी कर्ज देत नाही, तोपर्यंत तुम्हाला मोठे होता येत नाही. जिथे सर्वात जास्त बँका, तिथे सर्वात जास्त समृद्धी आपल्याला पहायला मिळते.

मुख्यमंत्री म्हणाले, सहकार क्षेत्रात उत्तम काम करणारे लोकही आहेत आणि ज्यांनी काही ना काही कारणांनी सहकार क्षेत्र बदनाम केले आणि ग्राहकांना देखील अडचणीत आणले, असेही अनेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. सहकारी बँकाचे उद्दिष्ट हे अत्यंत चांगले आहे.

पण काही सहकारी बँका जवळच्या व्यक्तींना विनातारण कर्ज देतात. नियमबाह्य कर्ज देतात. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत आणि त्यामुळे या बँका अडचणीत येत असतात. वसुलीच्या वेळी आपल्या हाती काहीच राहत नाही. मात्र अभिनंदन बँकेने ‘एनपीए’ शून्यावर आणून अभिनंदनास पात्र अशी कामगिरी केली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.