नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते आणि कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावू नका, असे भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आले आहे. नागपूर हे फडणवीस यांचे गृह शहर त्यामुळे येथे त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची जोरदार तयारी पक्ष कार्यकर्ते व नेत्यांनी केली होती. पण वाढदिवशी फलक व तत्सम प्रकार करू नका, कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे शिस्तभंगाची गंभीर दखल घेतली जाईल. असा इशारा देण्यात आला. त्यामुळे फडणवीस त्यांचा वाढदिवस कुठे साजरा करणार याबाबत उत्सुकता होती. पण ती आता संपली. ते या दिवशी राज्याच्या एका टोकाला असलेल्या दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यात जाणार आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यातील कोन्सारी येथे लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) च्या ४.५ मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेच्या स्टील प्रकल्पाचा पायाभरणी करणार आहेत. हा प्रकल्प विदर्भातील पहिला एकात्मिक स्टील प्रकल्प ठरणार आहे.मुख्यमंत्री फडणवीस २२ जुलै २०२५ रोजी कोन्सारी येथे स्टील प्रकल्पाची पायाभरणी करतील. त्याच दिवशी हेडरी येथे उभारण्यात आलेल्या ५ मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेच्या आयर्न ओर ग्राइंडिंग प्लांटचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. हा प्रकल्प एलएमईएलने केवळ एका वर्षात पूर्ण करून कार्यान्वित केला आहे. एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन म्हणाले, “गडचिरोली जिल्ह्यातील कोन्सारी येथे विदर्भातील पहिल्या एकात्मिक स्टील प्रकल्पाची पायाभरणी होत आहे. हे एक ऐतिहासिक स्वप्न साकार होण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.”
या सोबतच १० मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेच्या स्लरी पाइपलाइन प्रकल्पाचे उद्घाटनही होणार आहे. ही पाइपलाइन महाराष्ट्रातील पहिली कार्यरत लोखंड स्लरी पाइपलाइन ठरणार आहे. हेडरी ते कोन्सारी अशी ८५ किमी लांबीची पॅलेट प्लांट दरम्यान असलेली ही पाइपलाइन कच्च्या मालाच्या वाहतुकीसाठी महत्त्वाची असून, ती कार्बन उत्सर्जनात ५५ टक्के घट करेल आणि संपूर्ण प्रकल्पाच्या दळवणळणाची कार्यक्षमता वाढवेल.
शुक्रवारी विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. गुरूवारी विधानभवन परिसरात झालेल्या आमदार समर्थक कार्यकर्त्यांच्या धुमश्चक्रीचे पडसाद विधिमंडळात उमटले, त्यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडली.