बुलढाणा : भूतलावरील वैकुंठ अशी ख्याती अन महिमा असलेल्या पंढरपूर नगरीला आषाढीची वारी करण्यासाठी जाण्याची लाखो भाविकांची मनस्वी इच्छा राहते. मात्र, विविध अडचणीमुळे तिथे जाऊ न शकणारे भाविक विदर्भपंढरी शेगाव नगरीत दाखल होतात. आजही शेगावी हेच चित्र होते. रस्ते, मंदिर परिसर, दर्शनबारी, पारायण स्थळ आबालवृद्ध भाविकांनी नुसते फुलले होते. यामुळे शेगावी पंढरपूर अवतरल्याचा सुखद प्रत्यय भाविकांना आला.

वार्धक्य, आजार, प्रापंचिक अडचणी, आर्थिक चणचण, शेतीची कामे अश्या एक न अनेक अडचणी उद्भवतात. त्यामुळे पंढरीची वारी चुकते. मात्र देवाच्या दर्शनाची आस लागलेल्या आणि मनोमनी रुखरुख लागलेले बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भ मराठवाड्यातील आणि दूरवरचे भाविक शेगावकडे कूच करतात. गुरुमाऊली गजानन महाराजामध्ये विठू माऊलीचे रूप पाहणारे भाविक शेगावात दाखल होताच कृत्यकृत्य होतात. त्यांच्या मनाची रुखरुख, सल दूर होते. आज १७ तारखेला आलेल्या आषाढी एकादशीला शेगावात हेच चित्र, हिच भावना दिसून आली. पाऊणलाखाच्या आसपास भाविक संतनगरीत दाखल झाल्याचा अंदाज आहे. यापैकी एक असलेल्या एका अंध गायकाने स्वतःच ढोलकी वाजवित या भाविकांच्या भावना आपल्या, ‘गजानन बाबा द्या शांती मनाला, शेगावी आलो तुझ्या दर्शनाला’ या अर्थपूर्ण भजनाद्वारे व्यक्त केल्या. त्याची भजने ऐकण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती.

हेही वाचा – यवतमाळ : ‘सोशल क्लब’च्या नावाखाली जुगार! कोट्यवधींची उलाढाल; थेट उच्च न्यायालयातून परवानगी?

विठू माऊली, गण गण गणात बोतेचा गजर

आज शेगावात आषाढी एकादशी उत्सव पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. आज बुधवारी सकाळपासूनच शेगाव शहर भाविकांनी गजबजून गेले आहे. यात क्रमाक्रमाने वाढ होत गेली. मध्यान्ही मंदिर परिसर भावीकांनी गजबजून गेला होता. बस स्थानक, रेल्वे स्थानक ते गजानन महाराज संस्थान मंदिर मार्गावरील सर्व रस्ते भाविकांनी नुसते फुलून गेले होते. विठू माऊली आणि गण गणात बोतेच्या गजराने विदर्भ पंढरी दुमदुमली. संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

हेही वाचा – नागपूर : सावधान! जलजन्य आजाराचे रुग्ण वाढले, जाणून घ्या अन्नपदार्थ विक्रेत्यांसाठी असलेले नियम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रात्रभर मंदीर खुले

आज शेगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आषाढीला होणारी मोठी गर्दी आणि पाऊणलाख भाविकांचा अंदाज लक्षात घेऊन मंगळवारी रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले. यामुळे बुधवारी दर्शनबारीवरील ताण आणि भाविकांची असुविधा कमी झाली. मात्र, तरीही प्रत्यक्ष दर्शनासाठी अडीच ते तीन तासांचा अवधी लागत होता. मुख दर्शनासाठी पाऊण एक तासाचा अवधी लागला.