गडचिरोली : भाजपच्या दाव्यामुळे अहेरी विधानसभेत महायुतीचा अडकलेला पेच अखेर सुटला असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ३८ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली यात आत्राम यांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपचे माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केलेला दावा निष्फळ ठरल्याने समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
राजकीयदृष्ट्या गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या अहेरी विधानसभेवरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, आज बुधवारी अजित पवार गटाकडून येथे विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यामुळे या जागेवरील महायुतीतील तिढा अखेर सुटला आहे . परंतु भाजपपुढे आता बंडखोरीचे आव्हान उभे झाले आहे. याठिकाणी उमेदवारी डावलल्याने मंत्री आत्राम यांचे पुतणे तथा भाजपचे माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
आणखी वाचा-बल्लारपुर काँग्रेसकडे तर चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे
उमेदवारी मिळणार नाही, याची कुणकुण लागतात अम्ब्रीशराव आत्राम हे दोन दिवसांपूर्वीच मुंबईला रवाना झाले आहे. या ठिकाणी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. काही दिवसांपूर्वी मंत्री आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश करून थेट वडिलांनाच आव्हान दिले होते. त्यामुळे अहेरी विधानसभेत यंदा आत्राम राजघराण्यांमध्येच मोठी चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीकडून देखील याजागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दावा केला आहे.
आणखी वाचा-‘मी २८ तारखेस भाजपतर्फे अर्ज भरणार’ या उमेदवाराने स्वतःच केले जाहीर…
अम्ब्रीशराव काँग्रेस आणि शरद पवारांच्या संपर्कात
महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची आशा धूसर झाल्यानंतर भाजपचे माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी पर्याय शोधणे सुरू केले आहे. उमेदवारीसाठी त्यांनी दोन दिवसापूर्वी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे. सोबतच दिल्लीतील काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत त्यांचे बोलणे सुरू आहे. त्यामुळे अम्ब्रीशराव बंडाखोरी करणार जे आता जवळपास निश्चित झाले आहे. आता त्यांना कोणत्या पक्षाकडून संधी देण्यात येईल, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे वडिलांविरोधात बंड करून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या भाग्यश्री आत्राम यांच्या गोटात देखील उमेदवारीवरून अस्वस्थता दिसून येत आहे.