जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

श्री धीरेंद्र कृष्णजी महाराज यांचे सध्या नागपुरात श्री रामकथा प्रवचनासाठी आगमन झाले आहे. श्री रामकथा प्रवचन करण्याचा त्यांना अधिकार आहे. पण, ते रामकथेच्या नावावर दिव्य दरबार आणि प्रेत दरबार आयोजित करीत आहेत. महाराजांचे दिव्यशक्तीच्या दावे आणि प्रयोग हे महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्याचे तसेच ड्रग्स अँड मॅजिक रिमेडिस ॲक्टनुसार गुन्हेगारी कृत्य आहे. महाराजांनी त्यांची दिव्यशक्ती सिद्ध करून दाखवावी आणि ३० लाख रुपयांचे पुरस्कार मिळवावे, असे खुले आव्हान अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी दिले आहे.

हेही वाचा >>> सुरजागड लोहखनिज प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापले

श्याम मानव राज्य सरकारच्या जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष आहेत. त्यांनी या कायद्यानुसार स्वत:हून कारवाईचे अधिकार असलेल्या प्रमुख दक्षता अधिकारी आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्याकडे महाराजांच्या गुन्ह्याविषयीचा तपशील सादर केला आहे. त्यासंदर्भात प्रा. श्याम मानव यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.

ते म्हणाले, दिव्यशक्ती आजवर कोणीही सिद्ध केलेली नाही. जर महाराज ती करू शकत असतील तर चांगली गोष्ट आहे. त्यांनी समितीचे आव्हान स्वीकारावे आणि ३० लाख रुपयांचे पारितोषिक मिळवावे. महाराजांना ही रक्कम छोटी वाटू शकेल तेव्हा त्यांनी त्या रकमेसाठी नाहीतर किमान त्यांच्या दिव्यशक्ती लोकांसमोर सादर करून अधिकाअधिक लोकापर्यंत पोहचण्यासाठी तरी दिव्यशक्ती सिद्ध करावी. असे केल्यास आपण त्यांच्या पाया पडू आणि अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीचे काम बंद करू. देवा-धर्माला अजिबात विरोध नाही. पण देव-धर्माच्या नावावर जनतेची लूट, फसवणूक होत असेल तर जनतेला सतर्क करणे, त्यांचे प्रबोधन करणे समितीचे कर्तव्य आहे, असेही प्रा. श्याम मानव म्हणाले.

हेही वाचा >>> विश्लेषण: ‘अंनिस’ने नागपूरमध्ये आक्षेप घेतलेले धीरेंद्र कृष्ण महाराज आहेत कोण? हा वाद काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गडकरी, फडणवीस रामकथेला गेले असावे…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील महाराजांच्या कार्यक्रमाला हजेरी लावून आले, असे विचारले असता ते म्हणाले, ते रामकथेला तिकडे गेले असतील. त्यांना येथे लोकांची फसवणूक होत आहे याची कल्पना नसावी. फडणवीस आणि गडकरी यांनी जादूटोणा कायदा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते लोकांच्या फसवणुकीचे समर्थन करणार नाहीत, याकडेही प्रा. श्याम मानव यांनी लक्ष वेधले.