‘रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया’चा पुढाकार
नागपूर : जागतिक हृदय दिनानिमित्त २९ सप्टेंबरला भारतात २४ तासांत १० लाख नागरिकांची नि:शुल्क मधुमेह तपासणी केली जाणार आहे. रिसर्च सोसायटी ऑफ स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडियाच्या पुढाकाराने हा उपक्रम होणार असून तो यशस्वी झाल्यास त्याची एशिया बुक ऑफ रिकॉर्डमध्ये नोंद होईल, अशी माहिती रिसर्च सोसायटी ऑफ स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडियाचे कोषाध्यक्ष व हॅलो डायबेटिजचे डॉ. सुनील गुप्ता यांनी दिली.
मधुमेह तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, लहान मुले, तरुणवर्ग, वयस्क साऱ्यांनाच मधुमेह विळख्यात घेतो आहे. व्यसन, अनियंत्रित खाने, बदलत्या जीवनशैलीतून मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. देशात साडेसात कोटींवर मधुमेही आहेत. यातील पन्नास टक्के लोकांना आपल्याला मधुमेह आहे की, नाही हेच माहीत नाही. दरम्यान, विविध रुग्णालयांतील अतिदक्षता विभागात दाखल अत्यवस्थ रुग्णांपैकी केवळ २५ टक्के नागरिकांचाच मधुमेह नियंत्रित राहतो.
हृदयविकाराचा झटका येणाऱ्यांचा इतिहास जाणून घेतल्यास अनेकांना मधुमेह असल्याचे पुढे येते. दगावणाऱ्या रुग्णांमध्येही मोठय़ा प्रमाणात मधुमेहाचा इतिहास आढळतो. त्यामुळे मधुमेहाला हरवण्यासाठी हा उपक्रम
आहे.
या उपक्रमासाठी रिसर्च सोसायटी फार स्टडी ऑफ डायबेटिज इन इंडिया या संस्थेंने विविध सामाजिक संस्थांना सोबत घेत २८ सप्टेंबरच्या रात्री १२ वाजतापासून २९ सप्टेंबरच्या रात्री १२ पर्यंत देशात १० लाख नागरिकांच्या मधुमेह तपासणीचा निर्णय घेतला आहे. ही तपासणी विविध शहरातील या उपक्रमाशी जुळलेले मधुमेह तज्ज्ञ, औषध दुकानांसह इतरही ठिकाणी होणार असल्याचे डॉ. गुप्ता म्हणाले. नागपुरातील सुधार प्रन्यासची उद्याने, रुग्णालये, ३० औषध दुकानांसह विविध ठिकाणी सुमारे १५ हजार मधुमेह चाचणीचे नियोजन करण्यात आले आहे.
यासाठी शहरात १०० पथके तैनात असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला आहार तज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता, मी टू बी संस्थेचे चेतन मारवा उपस्थित होते.
कमी वयात मधुमेहाचे वाढते प्रमाण
करोनामुळे अनेकांच्या शरीरात साखर वाढल्याची अनेक प्रकरणे पुढे आली. त्यात तरुणांची संख्या मोठी आहे. या सर्वेक्षणात काही प्रमाणात ही आकडेवारी पुढे येण्याची शक्यता आहे. दरम्यान, मधुमेह तज्ज्ञांच्या निरीक्षणात पूर्वी जास्त वयात होणारा मधुमेह आता कमी वयातही होत असल्याचे दिसत असल्याचेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले.