अकोला : राज्यात सहकारी संस्थांच्या संगणकीकरणावर आता भर दिला जात आहे. संगणकीकरणाच्या माध्यमातून कामाला गती देण्याचे प्रयत्न आहेत. अकोला जिल्ह्यात त्या दृष्टीने मोठे कार्य झाले. ४१२ प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचे संगणकीकरण झाले असून त्यात ४१० संस्था ’गो लाईव्ह’ झाल्या आहेत. याद्वारे पोर्टल नोंदणी, तसेच प्रत्यक्ष कामकाजाच्या अनुषंगाने उर्वरित कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहे.

सहकारी संस्थांच्या कामकाजाचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला. यावेळी सहकारी संस्थेच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. अकोला जिल्ह्यात ११४ सहकारी संस्था असून त्यात सेवा सहकारी संस्था दुग्ध व मत्स्य व्यवसाय व इतर संस्थांचा समावेश आहे. प्राथमिक कृषी सहकारी संस्था ४१२ असून संगणीकरण झाले. संस्थांमध्ये सामायिक सेवा केंद्र कार्यान्वित करण्यासाठी कार्यवाही होत असून ३०० संस्थांमध्ये ती पूर्ण झाली, अशी माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी बैठकीत दिली.

जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे संगणकीकरण झाल्याने सहकार क्षेत्राला ‘आधुनिक टच’ लाभणार आहे. सहकार क्षेत्राच्या कामाला वेग येण्याची अपेक्षा आहे. जिल्ह्यातील संगणकीकरण न झालेल्या उर्वरित सहकारी संस्थांची देखील प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. भारतीय जन औषधी केंद्र सुरू करण्याच्या दृष्टिकोनातूनही कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.

चार संस्था अंतिम अवसायनात

सहकारी संस्था सहायक निबंधकांकडून मूर्तिजापूर तालुक्यातील चार सहकारी संस्था अवसायनात ठरविण्यात आल्या असून, तशी नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यासाठी अवसायकांची अंतिम सभा १९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वा. मुर्तिजापुर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील सहायक निबंध सहकारी संस्था कार्यालय येथे ठेवण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मूर्तिजापूर तालुक्यातील मानाता येथील जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्था, हिरपूर येथील महाराणा प्रताप गृह तारण सहकारी संस्था व शासकीय गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. तसेच श्री साईनाथ गृह तारण सहकारी संस्था मर्या. या चार संस्था अवसायनात घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे अंतिम सभेस संस्थेच्या संचालक मंडळांनी संपूर्ण कागदपत्रांसह वेळेत उपस्थित रहावे. सभेत हजर न राहिल्यास काहीही म्हणणे नाही, असे गृहीत धरून संस्थेची नोंदणी रद्द करण्याबाबतचा आदेश निर्गमित करण्यात येईल, असा इशारा सहायक निबंधक अनिल एस. शास्त्री यांनी दिला आहे.