नागपूर : दीक्षाभूमीवर धम्मचक्रप्रवर्तन दिन सोहळा मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरा होणार आहे. त्यासाठी देश-विदेशातून बौद्ध अनुयायी लाखोंच्या संख्येने मंगळवारपासून दीक्षाभूमीवर दाखल होण्यास सुरुवात झाली. बुधवारी दीक्षाभूमी येथे ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा सायंकाळी ६ वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या तीन दिवसीय सोहळ्याला रविवार २ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी महिला धम्म मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कमला गवई, भिक्खुनी विजया मैत्रेय, सुषमा पाझारे, प्राचार्य डॉ. भुवनेश्वरी मेहेरे, प्रा. सरोज आगलावे, डॉ. प्रज्ञा बागडे, छाया खोब्रागडे उपस्थित होत्या.सोमवारी भदंत आर्य नागर्जुन सुरेई ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत धम्म दीक्षेचा कार्यक्रम झाला. मंगळवारी सकाळी ९ वाजता भदंत ससाई यांच्या हस्ते पंचशीलचे ध्वजारोहन झाले. यावेळी समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात आली. सकाळी ११ वाजता थायलंड येथील भिक्खू संघातर्फे ५६ फुटांच्या बुध्द प्रतिमेसाठी जागेचे भूमिपूजन झाले. बुधवारी ५ ऑक्टोबरला सकाळी ६ ते ८.३० या दरम्यान बुध्द भीम गीतांचा कार्यक्रम, सकाळी ९ वाजता भदंत ससाई यांच्या उपस्थितीत सामूहिक बुध्द वंदना होईल.

हेही वाचा : नागपूर : संघाचा आज विजयादशमी उत्सव, सरसंघचालकांच्या प्रबोधनाबाबत उत्सुकता

दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर आणि दीक्षाभूमी परिसर पंचशिल ध्वज आणि निळ्या पताक्यांनी सजला आहे. दीक्षाभूमीकडे येणाऱ्या चारही बाजूंनी रस्त्यावर भोजनदानाची व्यवस्था आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जागोजागी करण्यात आली आहे. वृद्धांना वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी काही ठिकाणी आरोग्य शिबीर लावण्यात आले आहे. दीक्षाभूमीवर २५०० पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. नागरिकांना मदत व्हावी यासाठी दीक्षाभूमीच्या परिसरात ‘मिनी कंट्रोल रूम’ उभारण्यात आले आहे. तैनात पोलीस कर्मचारी गर्दी नियंत्रणासह नागरिकांना मदत करीत आहेत. दीक्षाभूमीच्या चारही प्रवेशद्वारावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dikshabhumi dhammchakra prvartan din nitin gadkari devendra fadanvis ramdas athavale nagpur tmb 01
First published on: 05-10-2022 at 09:08 IST