अकोला : चार जण एका निर्जनस्थळी धुम्रपान करीत असतांना ते मुलगी घेऊन आल्याचा संशय आला. त्यातून वाद निर्माण होऊन व्यापाऱ्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरातील मलकापूर येथील रेल्वे बोगद्याजवळ घडली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे वेगाने फिरवत आरोपींना १२ तासांच्या आत गजाआड केले.औद्यागिक वसाहत परिसरातील व्यापारी सुफियान खान, साजिद खान, मोहम्मद कैफ बक्शउल्ला खान हे मोटारीने मलकापूर येथील बोगद्याजवळ आले होते. त्याठिकाणी ते धुम्रपान करीत असतांना चार जण आले.
‘याठिकाणी मुलगी घेऊन आले आहे का?’ अशी विचारणा करून चौघांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. सुफियान खान यांनी कारखान्यातून इतरांना बोलवून आणण्यासाठी दोघांना पाठवले. घटनास्थळी सुफियान खान व साजिद खान यांना आरोपींनी बेदम मारहाण केली. सुफियान खान यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. यामध्ये गंभीर जखमी सुफियान खान शमशोद्दीन खान यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक आर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना केल्या. सर्व आरोपी निर्जनस्थळी दडून बसले होते. घटनास्थळावर सीसीटीव्ही कॅमेरा, आरोपीचे वर्णन किंवा त्यांच्या मोबाइलची माहिती नसल्याने तपासाचे आव्हान होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासह तीन अधिकारी व २० अंमलदार यांनी घटनास्थळाची पाहणी करून सर्व बाजुंनी तपासाला सुरुवात केली. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी फैजान खान मुर्शरफ खान, (रा. हाजी नगर शिवणी, अकोला), अब्दुल अरबाज अब्दुल इस्माईल (रा. ताज चौक, इंदीरा नगर अकोट फाईल, अकोला), शोएब अली उर्फ राजा तैयब अली (रा सैयदपुरा शिवणी, अकोला.) यांना वाशीम बायपास येथून सोमवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून एक पथक बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे रवाना झाले.
फरार होण्याच्या तयारीत असलेले आरोपी शेख अस्लम शेख अकबर (रा.सैयद पुरा शिवणी, अकोला.), सैय्यद शहबाज उर्फ सोनु सैय्यद मुजीब, (रा.अकोट फाईल,अकोला) व एका अल्पवयीन मुलाला दुचाकीसह ताब्यात घेतले. आरोपींकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील तपासासाठी त्यांना खदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मृतक व त्याचे साथीदार निर्जनस्थळी संध्याकाळी धुम्रपान करीत असतांना त्यांच्यासोबत मुलगी असल्याच्या संशयावरून वाद झाला. त्यातून मारहाण झाल्याचे आरोपींनी सांगितले.