नागपूर : लहानपणापासून आकाशात उंच उडायचे स्वप्न उराशी होते. परंतु, यासाठी व्यवसायिक वैमानिक न होता भारतीय वायुसेनेमध्ये जाऊन देशसेवा करण्याच्या ध्येयाने चौथ्या वर्गापासूनच पछाडले होते. घरचे वातावरण अभ्यासासाठी फार पोषक आहे असेही नाही. कठीण आर्थिक परिस्थितीशी सामना करत रामदासपेठ येथील सोमलवार शाळेच्या दिव्या आंबीलडुके हिने दहावी उत्तीर्ण होण्याआधीच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच ‘एनडीए’ पूर्वतयारीचे प्रशिक्षण देणाऱ्या नाशिकच्या शासकीय संस्थेमध्ये प्रवेश मिळवला. दहावीमध्ये ९७.४ टक्क्यांसह उत्तीर्ण होणाऱ्या दिव्याची आठ हजार विद्यार्थिनींमधून या संस्थेसाठी निवड झाली हे विशेष.
हेही वाचा >>> वाघिणीला वेढा : आणखी १५ चालक, गाईड निलंबित; ताडोबा व्यवस्थापनाची दुसऱ्या दिवशी कारवाई
दिव्याला लहानपणापासून वैमानिक व्हायचे होते. चौथ्या वर्गात असताना तिने एअर स्ट्राईकचे वृत्त पाहिले होते. त्यावेळी भारतीय वायुसेवा देशासाठी काय काम करते याची कल्पना तिला आली. आणि खासगी वैमानिक होण्यापेक्षा देशासाठी आपण काम करावे हा विचार दिव्याने केला. यातूनच ‘एनडीए’ प्रशिक्षणाची माहिती घेतली. दहावीच्या परीक्षेची तयारी करतानाच दिव्याने ‘सर्व्हिसेस प्रिपरेटीव्ह इन्स्टिट्यूट नाशिक’च्या प्रवेशासाठी पूर्वपरीक्षा दिली. या परीक्षेच्या तीनही पातळ्या उत्तीर्ण करून तिला प्रवेशही मिळाला. सोमवारी दहावीच्या निकालातही दिव्याने ९७.२ टक्क्यांसह घवघवीत यश मिळवले.
हेही वाचा >>> दारूची नशा अन् पैशांचा वाद; वकिलाने पक्षकारावरच घातले कुऱ्हाडीने घाव, हत्याकांडात मुलाचाही समावेश
दिव्याचे वडील अनेक दिवसांपासून आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे आई परिवाराची आर्थिक जबाबदारी उचलत आहे. अशा हलाखीच्या परिस्थितही जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर दिव्याचा यशस्वी प्रवास सुरू आहे. भविष्यात ‘एनडीए’त प्रवेश घेऊन भारतीय वायुसेनेमध्ये जाणार, असा विश्वास दिव्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागाच्या इयत्ता दहावीच्या निकालात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा २.२३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, असे असले तरी राज्यात सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. निकालाची टक्केवारी ९४.७३ नोंदवण्यात आली. बारावीप्रमाणे दहावीतही गोंदिया जिल्हा विभागामध्ये ९६.११ टक्क्यांसह अव्वल ठरला आहे.