नागपूर : जगातील महिलांमधील सर्वोत्तम बुद्धिबळपटूंपैकी एक म्हणून ओळख मिळवणाऱ्या दिव्या देशमुख हिने महिला विश्वचषक जिंकल्यावर तिच्या सोशल मीडियावर एक खास क्षण शेअर केला आहे. ‘अनस्टॉपेबल’ या प्रेरणादायी गाण्याच्या पार्श्वभूमीवर तिने आपला विजय साजरा करत असलेला फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला असून, त्यात ती सुवर्ण मुकुटासारखा चषकालाला चुंबन देताना दिसते. पोस्टसोबत तिने “माय टर्न” (माझा नंबर आला) असे लिहिले आहे, जे तिच्या आत्मविश्वास आणि यशाकडे वाटचाल दर्शवते.
दिव्याच्या या पोस्टला अवघ्या २१ तासांत तब्बल १.३८ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून,चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या या विजयानंतर, भारताच्या बुद्धिबळ क्षेत्रात आणखी एक नवे पर्व सुरू झाल्याचे दिसत आहे. या पोस्टच्या नंतर दिव्याने विजयाचे दुसरे फोटो देखील शेअर केले.
महिला वर्ल्ड कप २०२५ मध्ये सुवर्णपदक जिंकून भारतासाठी अभिमानास्पद यश मिळवणाऱ्या दिव्या देशमुख हिने आपल्या भावनांना शब्द देताना सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ‘दि फर्स्ट स्टेप, बट इट्स बीन गोल्ड’ अर्थात हा केवळ पहिला टप्पा आहे. पण तो सुवर्णमय ठरला आहे असे तिने लिहिले. या एका वाक्यातून तिने केवळ आपल्या विजयानंदाची अभिव्यक्ती केली नाही, तर पुढील स्पर्धांसाठी ती किती सज्ज आणि आत्मविश्वासाने भरलेली आहे, हेही स्पष्ट केले.
विजयाच्यापूर्वीही डरकाळी
‘आय एम दि चॅम्पियन अँड यू आर गोईंग टू हिअर माय रोअर’ म्हणजे ‘मी विजेता आहे आणि माझी सिंहगर्जना आता सगळ्यांना ऐकू येणार’ अशा शब्दात बुद्धिबळाची विश्वविजेती दिव्या देशमुखने अंतिम फेरीपूर्वी डरकाळी दिली होती आणि तिच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला होता. शनिवार २६ जुलैला अंतिम फेरी सुरू होण्याच्या काही तासांपूर्वी दिव्याने वरील गाणे पोस्ट करत तयारी दर्शवली होती. ‘सोप्या मार्गाने अंतिम फेरी गाठण्यात मजा काय? थोडे नाट्य नसेल, तर ती मी कसली…’ अशा शब्दांचा वापर करत तिने स्वत:ची शैलीही या माध्यमातून प्रदर्शित केली.
समाजमाध्यमावर सक्रिय
१९ वर्षीय दिव्या ही समाजमाध्यमावर चांगलीच सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर दिव्या चेस नावाचे तिचे अकाऊंट असून तिचे एक लाख ८८ हजार फॉलोअर्स आहे. अंतिम फेरीच्या पोस्टमध्ये तिने कॅटी पेरी यांच्या रोअर गीताचा वापर केला आणि विजयाची डरकाळी दिली. मी जिंकणार आहे आणि सर्वांना या विजयाची गर्जना ऐकू येईल, असे तिने ठामपणे सांगितले. तीन दिवस चाललेल्या अंतिम फेरीत तिचा हा विश्वास तिने खरा करूनही दाखविला.