अकोला : वंचित, गरजू, निराधारांच्या जीवनात दिवाळसणाचा आनंद पेरुन ‘सामाजिक उपक्रमांची दिवाळी पहाट’ हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने राबविण्यात आला. हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्यांना दिवाळीनिमित्त नवीन कपडे देऊन खमंग फराळाची मेजवानी देण्यात आली. शहरातील सुमारे ५०० निराधारांना कपडे व फराळाचे वाटप केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.

दीपोत्सवानिमित्त प्रत्येक घरात चैतन्याचे वातावरण असते. नवीन कपडे, फटाक्यांचे आतषबाजी व खमंग फराळाच्या मेजवानीचा आनंद घेतला जातो. समाजातील गरजू, निराधारांना सुद्धा सणाचा आनंद मिळण्यासाठी सामर्थ्य फाउंडेशनने पुढाकार घेतला. अनेक गरजूंच्या जीवनात दिवाळीचा आनंद पेरण्यासाठी ‘सामर्थ्य’ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पहाटे कपड्यांसह चविष्ट फराळाचे वाटप केले. मिष्टान्नाचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली. महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या निवासस्थानी प्रातिनिधिक स्वरूपात उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. योगीता कछोट, सम्यक आणि संयम कछोट यांच्या हस्ते गरजूंना साहित्याचे वितरण केले. यावेळी संस्थाध्यक्ष प्रबोध देशपांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद देव, कनिष्ठ उपाध्यक्ष प्रवीण पळसपगार, सचिव डॉ. गजानन वाघोडे, कोषाध्यक्ष रवींद्र बुलनकर, सहसचिव सुर्यकांत बुडकले, सहकोषाध्यक्ष प्रशांत चाळीसगांवकर, सल्लागार डॉ. दीपक दामोदरे, प्रा.अशोक सोनोने, कायदेविषयक सल्लागार ॲड.संतोष भाेरे, कार्यकारिणी सदस्य राजकुमार उखळकर, दिनेश चंदन, मिलिंद देव, किरण चौक, श्रीराम देशपांडे, विलास राठोड, मुकुंद देशमुख, संजय देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

हेही वाचा >>>अकोला : उड्डाणपूल लोकार्पणावरून जुंपली; ‘वंचितने भाजपला शहाणपण शिकवण्याची…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील गरजू, निराधारांच्या जीवनात दिवाळीचा आनंद पेरण्याचा ‘सामर्थ्य’चा उपक्रम स्तुत्य असल्याची भावना पवनकुमार कछोट यांनी व्यक्त केली. उपक्रमाच्या पहिल्या दिवशी रस्त्याच्या कडेला राहणारे, शहराच्या विविध भागातील झोपडपट्टीतील रहिवासी, बसस्थानक, रेल्वेस्थानक व मंदिरांपुढील भिक्षेकरी यांच्यासह असंख्य गरजूंना कपडे व फराळ वाटप केले. सामर्थ्य फाउंडेशनच्या ‘सामाजिक उपक्रमांची दिवाळी पहाट’ अंतर्गत पाडवा व भाऊबिजेला देखील गरजूंना कपडे व फराळाचे वाटक केले जाणार आहे. या उपक्रमाला अनेक दानशूनांची मदत झाली आहे.